कुरंगवडीत मळणी यंत्रात अडकून झालेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी अखेर दोन महिन्यांनंतर ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल

नसरापूर : भोर तालुक्यातील कुरंगवडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत मळणी करताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात दि. १४ एप्रिल रोजी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस हवालदार मयूर महादेव निंबाळकर यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास कुरंगवडी गावच्या हद्दीत वाटाण्याच्या पिकाची मळणी सुरू होती. यावेळी ट्रॅक्टर (एम.एच. १२ वाय.एस. ०२९२) आणि त्यास जोडलेल्या मळणी यंत्राचा वापर केला जात होता. मळणीदरम्यान मयत शुभांगी निलेश राऊत (वय ४२) यांचा स्कॉर्फ ट्रॅक्टरच्या जॉईंटमध्ये अडकला. यंत्रावर कोणतेही सुरक्षा कवच नसल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला होता.

Advertisement

या प्रकरणी आता ट्रॅक्टर चालक जनार्दन उर्फ सुनील रघुनाथ काटे (रा. कुरंगवडी, ता. भोर, जि. पुणे) याने निष्काळजीपणा व सुरक्षेची उपाययोजना न केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस हवालदार नाना मदने करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page