गर्भलिंगनिदानाच्या काळ्या धंद्यात किकवी कनेक्शन; डॉ. मंदार माळीवर गुन्हा दाखल, यवत पोलिसांच्या तपासात मोठा खुलासा
भोर : दौंड तालुक्यातील केडगाव परिसरात उघडकीस आलेल्या अत्यंत हाय-प्रोफाइल आणि बेकायदेशीर गर्भलिंगनिदान प्रकरणाची पाळेमुळे खणून काढण्यात यवत पोलिसांना मोठे यश आले आहे. या प्रकरणात आता थेट भोर तालुक्यातील किकवी येथील डॉ. मंदार माळी(साईस्पर्श क्लिनिक) यांच्यासह उरुळी कांचन येथील सुंदरम कदम यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
या कारवाईमुळे या काळ्या धंद्यातील आरोपींची संख्या आता पाचवर पोहोचली असून ग्रामीण भागातील काही डॉक्टरांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. डॉ. मंदार माळी ((साईस्पर्श क्लिनिक, किकवी, ता. भोर) आणि सुंदरम कदम (उरुळी कांचन, ता. हवेली) हे दोघेही सध्या फरार असून यवत पोलीस त्यांच्या मागावर आहेत.
दरम्यान, या प्रकरणातील मुख्य आरोपी अण्णासाहेब गिरी आणि त्याचा डॉक्टर साथीदार अतुल जाधव यांना न्यायालयाने पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीत सुरू असलेल्या चौकशीतूनच या दोन्ही फरार डॉक्टरांची नावे समोर आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. गर्भलिंगनिदानासाठी वापरण्यात येणारे बेकायदेशीर सोनोग्राफी मशीन आरोपी अण्णासाहेब गिरी याला नरेंद्र ठाकरे याने पुरवले होते. नरेंद्र ठाकरे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास पोलीस उपनिरीक्षक मारोती मेतलवाड करत असून, या रॅकेटमधील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





