शिंदेवाडीत जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांचा छापा; साडेतीस लाखांचा मुद्देमाल जप्त, सहा जण जेरबंद

खेड शिवापूर : पुणे- सातारा महामार्गावरील शिंदेवाडी(ता. भोर) परिसरात सुरू असलेल्या सोरट जुगार अड्ड्यावर राजगड पोलिसांनी गुरुवारी (दि. ११ जून) सायंकाळी धाड टाकत तब्बल ३० लाख ६५ हजार ६२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेण्यात आले असून १० ते १२ जण घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे शिंदेवाडी गावच्या हद्दीतील जुन्या पुणे-सातारा रस्त्यालगत हॉटेल आमराईजवळील पत्र्याच्या शेडमध्ये छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी सोरट नावाचा जुगार खेळत असल्याचे निष्पन्न झाले. या कारवाईत जुगारासाठी वापरण्यात येणारे डिजिटल सोरट मशीन, टेबल, खुर्च्या, स्टुल, जुगाराचे चार्ट, हिशोबाच्या वह्या, कच्च्या स्लिपा, विविध कंपन्यांचे महागडे मोबाईल फोन, रोख रक्कम, जुगाराचे टोकन, दुचाकी वाहने तसेच महिंद्रा एक्स.यू.व्ही. ७०० ही चारचाकी जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ३० लाख ६५ हजार ६२० रुपये इतकी आहे.

Advertisement

या प्रकरणी सचिन अंकुश बागल(रा. कात्रज), मनोज दिनकर काळाणे(रा. कात्रज), सशांक मच्छीद्र मेमाणे(रा. धनकवडी), गणेश पांडुरंग वाळुंज(रा. कात्रज), धनाजी राजाभाऊ जाधव(रा. कात्रज) आणि निखील रामचंद्र तुगंतकर(रा. कात्रज) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल पप्पू रामा शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page