खेड शिवापूर टोल नाक्यावर कायद्यालाच आव्हान; कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसावर हल्ला, एकाला अटक, दुसरा फरार
खेड शिवापूर : पुणे सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पार पाडत असताना राजगड पोलिस ठाण्याच्या वाहतूक शाखेतील पोलिस हवालदार प्रशांत राऊत यांच्यावर काही व्यक्तींनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात राऊत जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, खेड शिवापूर टोल नाक्यावर नियमितपणे वाहतूक नियमनाचे काम सुरू असताना काही व्यक्तींशी झालेल्या वादातून हा प्रकार घडला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर हवालदार प्रशांत राऊत यांच्यावर हल्ला करण्यात आला. या घटनेत त्यांना दुखापत झाल्याने सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले. मात्र, दुसरा आरोपी घटनास्थळावरून पसार झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कामाला लागली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, प्रत्यक्षदर्शींची माहिती आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष जाधव यांनी रुग्णालयात भेट देत जखमी हवालदार प्रशांत राऊत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यावर झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात संताप व्यक्त होत असून, आरोपींविरुद्ध कठोर कारवाईची मागणी होत आहे.





