ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सरपंच सेवा महासंघ आक्रमक; ग्रामसभेत काळ्या फिती लावून निषेध
भोर : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर ग्रामपंचायतीतील अधिकारी पी. एन. पाटील यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचारी व लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी सरपंच सेवा महासंघ, भोर तालुका शाखेने केली आहे.
यासंदर्भात पंचायत समिती भोरच्या पदाधिकाऱ्यांना व गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. तसेच ऑगस्टमधील ग्रामसभांमध्ये काळ्या फिती लावून निषेध नोंदवून, ग्रामसभा सुरू करण्यापूर्वी पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून दोन मिनिटे मौन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ग्रामसभेच्या नावाखाली अधिकारी-कर्मचाऱ्यांना धमकी, शिवीगाळ, अपमान किंवा शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच गरजेनुसार ग्रामसभांना पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी महासंघाने केली आहे.
“गावातील प्रशासन दहशतीखाली चालणार नाही; मतभेद लोकशाही आणि कायदेशीर मार्गानेच मांडले पाहिजेत,” अशी ठाम भूमिका महासंघाचे अध्यक्ष अमोल भाऊसाहेब लिमण यांनी मांडली. पी. एन. पाटील यांच्या निधनाबद्दल महासंघाने दुःख व्यक्त करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.





