शिवरे दिगर ग्रामपंचायत अधिकाऱ्याच्या मृत्यूचा भोरमध्ये निषेध; ग्रामसभा बहिष्काराला गटविकास अधिकाऱ्यांचा पाठिंबा
भोर : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे दिगर ग्रामपंचायतीत ग्रामसभेदरम्यान झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत अधिकारी पी. एन. पाटील यांच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनेचा भोरमध्ये तीव्र निषेध करण्यात आला. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन DNE-136, भोर तालुका शाखेच्या वतीने पंचायत समिती येथे निषेध सभा घेण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी घटनेबद्दल शोक व्यक्त करत दिवंगत पी. एन. पाटील यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच ग्रामपंचायत अधिकारी संघटनेने घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. ग्रामसभा व शासकीय कामकाजाच्या वेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धमकी, मानसिक दबाव किंवा शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या घटनांना आळा घालण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी संघटनेने केली.
ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि गैरवर्तन करणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली. राज्य शाखेच्या निर्णयानुसार ग्रामसभा बहिष्कार आंदोलनाला भोर तालुका शाखेने सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. यासंदर्भात गटविकास अधिकारी तसेच तहसीलदार, भोर यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष नवनाथ झोळ, सचिव महेश कालेकर, उपाध्यक्ष परमेश्वर खटके, कोषाध्यक्ष लक्ष्मण ढवळे, प्रसिद्धीप्रमुख सुनील भोकरे, मा. सचिव विजय कुलकर्णी, मा. अध्यक्ष अभय निकम यांच्यासह भुषण पुरोहित, स्वाती महांगरे, प्राची बांदल, ज्योती जाधव तसेच संघटनेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेच्या शेवटी पी. एन. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी ठाम मागणी संघटनेने केली.





