भोलावड्यातील राजा रघुनाथराव विद्यालयाला ‘भोलावडे’ नावाची ओळख द्या; ग्रामपंचायतीकडून निवेदन
भोर : भोलावडे येथील राजा रघुनाथराव विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या संस्थेच्या नावात ‘भोलावडे’ गावाचे नाव समाविष्ट करण्यात यावे, या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्या वतीने भोरचे तहसीलदार व विद्यालयाचे प्राचार्य यांना निवेदन देण्यात आले.
मौजे आपटी, पसुरे, सारोळे, रायरी आदी ठिकाणी असलेल्या विद्यालयांच्या संस्थांच्या नावात संबंधित गावांची नावे समाविष्ट आहेत. मात्र, भोलावडे येथील संस्थेच्या नावात ‘भोर’ हे नाव असल्याने ‘राजा रघुनाथराव विद्यालय, भोलावडे, भोर’ असे नाव करण्यात यावे, अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आली आहे.
यासंदर्भात प्राचार्य राजा रघुनाथराव विद्यालय, माननीय तहसीलदार भोर तसेच शिक्षण अधिकारी, पंचायत समिती भोर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रवीण जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच प्रशांत पडवळ, उपसरपंच अविनाश आवाळे, गणेश आवाळे, सदस्य ज्ञानेश्वर तारू, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र धर्मा आवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आदित्य आवाळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बाळू आवाळे आदी यावेळी उपस्थित होते.





