‘आमदार’ असल्याचा बनाव! कारवर महाराष्ट्र विधानसभा सदस्याचा लोगो, गाडीत मद्यधुंद तरुण; शिरवळ पोलिसांकडून ३५ वर्षीय तरुणावर कारवाई

खंडाळा : केसुर्डी (ता. खंडाळा) गावच्या हद्दीतील पुणे-सातारा जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर कारवर ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ असा लोगो लावून फिरणाऱ्या ३५ वर्षीय तरुणावर शिरवळ पोलिसांनी कारवाई केली. संबंधित कार जप्त करण्यात आली असून, कारचालक विशाल राजेंद्र यादव (वय ३५, रा. केदारेश्वर नंदनवन अपार्टमेंट, शिरवळ, ता. खंडाळा) याच्याविरुद्ध शिरवळ पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

केसुर्डी येथील सर्व्हिस रोडवर एम.एच. ०९ डी.जे. ६६८८ क्रमांकाच्या कारच्या पुढील व मागील बाजूस हिरव्या रंगाचा वर्तुळाकार लोगो लावण्यात आला होता. त्यावर पांढऱ्या रंगात ‘महाराष्ट्र विधानसभा सदस्य’ असा उल्लेख, तसेच हिरव्या रंगातील अशोक स्तंभ आणि त्यामध्ये पांढऱ्या रंगात ‘आमदार’ असा लोगो असल्याचे शिरवळ पोलिसांच्या निदर्शनास आले.

यानंतर पोलिसांनी कारचालक विशाल यादव याची चौकशी केली असता तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे आढळून आले. तसेच स्वतः किंवा कुटुंबातील कोणताही सदस्य महाराष्ट्र विधानसभा सदस्य नसताना आमदार असल्याचा भास निर्माण करणारा लोगो कारवर लावल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

Advertisement

या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी कारसह विशाल यादव याला ताब्यात घेतले. आमदाराचा लोगो लावलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. याबाबत पोलीस अंमलदार अरविंद बाऱ्हाळे यांनी फिर्याद दिली असून पोलीस अंमलदार शिवाजी जाधव अधिक तपास करीत आहेत.

“शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत भामटेगिरीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर आणि फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या निर्देशानुसार शिरवळ पोलीस कटिबद्ध आहेत. नागरिकांनी कायदेशीर नियमांचे पालन करून वावरणे आवश्यक असून फळकुट दादांना आणि भामट्यांवर कडक कारवाई करण्यात येईल.  

             – महेश इंगळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, शिरवळ पोलीस ठाणे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page