वडिलोपार्जित जमीन हडपल्याचा आरोप; खोटी माणसे उभी करून बनावट दस्तऐवज केल्याप्रकरणी भोर पोलीस ठाण्यात ८ जणांवर गुन्हा दाखल

भोर : वडिलोपार्जित जमिनीच्या व्यवहारात खोटी माणसे उभी करून, बनावट सह्या व ओळखपत्रांचा वापर करत खोटे दस्तऐवज तयार करून जमीन हडपल्याचा आरोप करत भोर पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणूक, बनावट दस्तऐवज तयार करणे व वापरणे, शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी यांसह ॲट्रॉसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी संदीप तुकाराम जगताप (वय ५०, रा. भूगाव, ता. मुळशी, मूळ रा. रांजे, ता. भोर) यांनी भोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानूसार शशिकांत रामभाऊ कंक (रा. भूतोंडे, ता. भोर), बाजीराव शिळीमकर (रा. भोरडी, ता. वेल्हा), दीपक दिगंबर नाईक (रा. कोथरूड, पुणे), अमोल पांडुरंग पाटील (रा. सेनापती बापट रोड, पुणे), राजेंद्र रामभाऊ कंक (रा. मंगळवार पेठ, भोर), सिद्धार्थ किसन जगताप, बबन धोंडीबा जगताप आणि बबन लक्ष्मण जगताप (तिघेही रा. सांगवी, ता. भोर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisement

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००८ ते २०१३-१४ या कालावधीत मौजे सांगवी वे.खो. आणि साळुंगण (ता. भोर) येथील वडिलोपार्जित जमिनीबाबत आरोपींनी संगनमत केल्याचा आरोप आहे. फिर्यादीच्या वडिलांचे चुलते तसेच भावकीतील व्यक्तींच्या नावाने खोटी माणसे उभी करून, बनावट सह्या व खोटी ओळखपत्रे वापरून खोटे दस्तऐवज तयार करण्यात आले, असा आरोप फिर्यादीने केला आहे.

ही जमीन महार वतनाची असल्याची माहिती असतानाही बनावट दस्तऐवजांच्या आधारे खरेदीखत करून घेण्यात आले आणि फसवणूक करून आपल्याला भूमिहीन करण्यात आले, असा दावा फिर्यादीने केला आहे. या प्रकाराला विरोध केला असता दीपक दिगंबर नाईक याने जातिवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत दमदाटी केल्याचा आरोपही फिर्यादीने केला आहे.

याबाबत भोर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी कायद्याच्या कलमांसहित विविध कलमान्वये आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page