राजेवाडीतील तरुणीच्या हत्येचे गूढ अखेर उलगडले; बाप-चुलत्यानेच केला खून; १६ दिवसांनी भांडं फुटलं

शिरवळ : भोर-शिरवळ मार्गावरील राजेवाडी (ता. खंडाळा) येथील निर्जन रस्त्याच्या कडेला १४ सप्टेंबर रोजी अनोळखी तरुणीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. कोणताही ठोस धागादोरा नसताना स्थानिक गुन्हे शाखेने १५ दिवसांहून अधिक काळ अहोरात्र तपास करून या खुनाचा छडा लावला. मृत तरुणीची ओळख हर्षदा हणुमंत जाधव (वय १९, रा. लक्ष्मीविषणु पार्क, जांभुळवाडी, आंबेगांव खुर्द ता.हवेली) अशी पटली असून, तिच्या खुनाप्रकरणी तिचे वडील हणुमंत दामोदर जाधव आणि चुलते बाळू अंकुश जाधव (रा. तळेगांव दाभाडे, ता.मावळ) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

सुरुवातीला शिरवळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मात्र, मृतदेह संशयास्पद परिस्थितीत आढळल्याने पोलीस घातपात असल्याच्या दृष्टीने तपास सुरु करण्यात आला. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार केले. या पथकाने शिरवळ परिसरात ठाण मांडून घटनास्थळाची वारंवार पाहणी केली. भोर, कापूरहोळ, नसरापूर तसेच सातारा-पुणे महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तसेच गोपनीय बातमीदारांकडून माहिती घेत तांत्रिक तपासाच्या आधारे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेल्या वाहनाचा माग काढण्यात आला.

Advertisement

वाहनाचा माग मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित व्यक्तींचा शोध घेत कौशल्यपूर्ण चौकशी केली. त्यातून मृतदेहाची ओळख हर्षदा जाधव अशी पटली आणि तिच्या खुनाचा उलगडा झाला. पोलिसांच्या तपासानुसार, हर्षदा ही घरातील लोकांना शिवीगाळ करणे, वाईट मुलांसोबत रात्रभर बाहेर फिरणे, व्यसन करणे, घरातील लोकांना खोटया केसमध्ये अडकविण्याची धमकी देणे अशा प्रकारे त्रास देत असल्याच्या कारणातून तिचे वडील आणि चुलते यांनी तिला बाहेर जेवायला जाण्याच्या बहाण्याने वाहनातून नेले. त्यानंतर तिच्या डोळ्यांत व तोंडात चटणी टाकून, तोंड व नाक दाबून तिचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

या तपासात पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी, अमोल माने, जयवंत खांडके, स्वप्निल कुंभार, स्वप्निल दौंड, विजय निकम यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व शिरवळ पोलीस ठाण्याच्या पथकाने महत्त्वाची भूमिका बजावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि फलटण विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, रोहित फार्णे, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर, चंद्रकांत पुजारी तसेच स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरवळ पोलिसांच्या पथकाने केली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page