भाटघर प्रकल्पातील येवली पुनर्वसनाच्या रस्ता व गटार कामांची स्वतंत्र चौकशी करण्याची ग्रामस्थांची मागणी

भोर : भाटघर प्रकल्पांतर्गत येवली पुनर्वसन गावठाणातील नागरी सुविधा कामांसाठी मंजूर झालेल्या ९८ लाख ६१ हजार रुपये निधीच्या वापराबाबत ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. मंजूर कामे आणि प्रत्यक्ष झालेल्या कामांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी ५० हून अधिक ग्रामस्थांनी स्वाक्षऱ्यांसह प्रशासनाकडे केली आहे.

३० मार्च २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार येवली अंतर्गत रस्त्यावरील बंदिस्त गटारासाठी ४९ लाख २५ हजार, तर रस्ता काँक्रीटीकरणासाठी ४९ लाख ३६ हजार मंजूर करण्यात आले आहेत. मंजूर अंदाजपत्रकाच्या तुलनेत प्रत्यक्ष किती काम झाले, कामाची लांबी-रुंदी व गुणवत्ता काय आहे, तसेच मोजमाप पुस्तिका, बिले, देयके आणि पूर्णत्व प्रमाणपत्रातील नोंदी प्रत्यक्ष कामाशी जुळतात का, याची तपासणी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

Advertisement

तसेच, मागील तीन-चार वर्षांतील अपूर्ण रस्त्यांच्या कामांचीही चौकशी करून मंजूर व प्रत्यक्ष कामाची लांबी आणि खर्चाची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तथा पुनर्वसन उपसंचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती भोर आणि ग्रामपंचायत येवली यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

“निधी मंजूर झाला; मात्र प्रत्यक्षात किती काम झाले, याचा स्पष्ट हिशेब जनतेसमोर यावा,” अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तपासणीत अनियमितता आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page