“कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका”, मांडेकरांसमोरच अजितदादांची कार्यकर्त्यांना तंबी
पुणे : दौंड तालुक्यातील केडगाव चौफुला येथील गोळीबार प्रकरणात पक्षाच्या आमदाराच्या भावाचे नाव समोर आल्याने टीकेचे धनी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एका कार्यक्रमात सज्जड दम दिला.
“कुठे चौफुल्याला जाऊन तडफडू नका किंवा कुठे जाऊन ठौंय ठौंय करू नका,” अशा शब्दांत त्यांनी कार्यकर्त्यांना तंबी दिली. विशेष म्हणजे, ज्यांचे बंधू या प्रकरणात आरोपी आहेत, ते आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीतच अजित पवारांनी ही तंबी दिल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा सुरू आहे.
वाखारी गावातील न्यू अंबिका कला केंद्रात गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारात भोर वेल्हा मुळशीचे राष्टवादी अजित पवार गटाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले होते. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) पीडीसीसी बँकेतील एका कार्यक्रमात बोलाताना अजित पवारांनी आमदार शंकर मांडेकर यांच्यासमोरच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तंबी दिली. “तुम्ही आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आहात. तुमच्याकडून कधीही, कुठेही काही चूक होऊ देऊ नका. अशा शब्दात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे दिले.