राजगड तालुक्यात काळ्या जादूची छाया? माजी सरपंचाच्या मुलाचा फोटो लिंबू, बिबवा, खिळ्यासहित बाभळीच्या झाडावर
राजगड : तालुक्यातील हिरपोडी गावात अंधश्रद्धेचा अत्यंत भयावह आणि संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. गावातील राईस मिलच्या शेजारी असलेल्या एका शेतातील बाभळीच्या झाडाला लिंबू, बिबव्यासहित तीन फोटो खिळा ठोकून लावलेले आढळून आले. ही घटना बुधवारी (दि. ३० जुलै) उघडकीस आली. विशेष म्हणजे त्यापैकी एक फोटो गावच्या माजी सरपंच सरुबाई कोडीतकर यांचा मुलगा विठ्ठल कोडीतकर याचा असल्याची स्थानिकांनी खात्री पटवली आहे. उर्वरित दोन फोटोतील व्यक्तींचे चेहरे जोरदार पावसामुळे अस्पष्ट झाले असून, त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
या प्रकाराला केवळ अंधश्रद्धा म्हणून बाजूला काढता येणार नाही. लिंबू, बिबव्यासहित झाडाला खिळा ठोकलेले फोटो, विशेषतः जिवंत व्यक्तींचे फोटो लावणे हे प्रचलित अघोरी कृत्यांपैकी एक मानले जाते. या घटनेने संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, ग्रामस्थांमध्ये भय, संभ्रम आणि संताप आहे. अनेकांनी यामागे पूर्वनियोजित कट असावा, अशीही शंका व्यक्त केली आहे.
विठ्ठल कोडीतकर यांचा फोटो स्पष्ट दिसत असल्याने ही घटना वैयक्तिक अथवा राजकीय सूडातून घडवण्यात आली असावी अशी जोरदार शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पोलीस अथवा प्रशासनाने अद्याप याची चौकशी केली नाही, ही बाब चिंतेची आहे. अशा प्रकारच्या अघोरी कृत्यांना रोखण्यासाठी कायद्याची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्यात अंधश्रद्धा व अघोरी विधींवर बंदी घालण्यासाठी “महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन आणि काळी जादू प्रतिबंध अधिनियम, २०१३” अस्तित्वात आहे. या कायद्यांतर्गत अशा कृत्यांना दोन वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो. मात्र, अनेक प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासन याकडे “मामुली गावातला प्रकार” म्हणून दुर्लक्ष करत असल्यामुळे अंमलबजावणीत अपयश दिसून येते.