भोरमध्ये राजकीय रंगत वाढली; संग्राम थोपटेंचे कट्टर समर्थक विशाल कोंडेंचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
नसरापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच भोर तालुक्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. गावोगावी राजकीय हालचालींना वेग आला असतानाच, माजी आमदार संग्राम थोपटे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे विशाल उर्फ बंटी कोंडे यांनी मोठा राजकीय निर्णय घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विद्यमान आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत पुण्यातील सर्किट हाऊस येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.
विशाल कोंडे यांनी काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या ‘आखाड पार्टी’च्या कार्यक्रमातच याचे संकेत दिले होते. त्यावेळी संग्राम थोपटें बरोबर शंकर मांडेकर यांनाही या कार्यक्रमात बोलावून एकाच मंचावरून संवाद साधत, त्यांनी आपली पुढील दिशा स्पष्ट केली होती. विशाल कोंडे हे केळवडे (ता. भोर) गावचे सुपुत्र असून वेळू नसरापूर जिल्हा परिषद गटातील नसरापूर गणात पंचायत समिती साठी ते इच्छुक आहेत. त्यांनी कामाच्या माध्यमातून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. परिसरातील गावांमध्ये त्यांची चांगली पकड आहे.
“गेल्या ५-६ वर्षांपासून मी समाजाभिमुख उपक्रम सातत्याने राबवत आहे. लोकांचे प्रश्न, अडचणी, अपेक्षा मला ठाऊक आहेत. संधीचे मी सोने करून दाखवीन,” असा ठाम विश्वासही कोंडे यांनी यावेळी व्यक्त केला. विशाल कोंडेंच्या प्रवेशामुळे भोर तालुक्यातील स्थानिक राजकारणात नवा रंग भरला आहे.