मीच तुमचा ‘नेता’! भोर तालुक्यात ‘आखाड पार्टी’तून निवडणुकीची रणधुमाळी सुरू; मतदारांच्या घशात ‘बिर्याणी’, पण मनात प्रश्नांची ‘भूक’
मुख्य संपादक : दिपक महांगरे
भोर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा अद्याप झाली नसली, तरी भोर तालुक्यात राजकीय आखाडा भरायला लागला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर अनेक वर्ष गायब असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आपापले राजकीय बस्तान हलवायला सुरुवात केली असून, “आखाड पार्टी”च्या निमित्ताने सगळीकडे राजकीय उत्सवाचा माहोल तयार झाला आहे.
सामाजिक मुखवटा आणि राजकीय डाव…
हे इच्छूक नेते अचानकपणे ‘स्नेहभोजन’, ‘कार्यकर्ता संवाद’, ‘आखाड पार्टी’ या कार्यक्रमांचे आयोजन करू लागले आहेत. या कार्यक्रमांचे नाव काहीही असो, आतला उद्देश एकच माझ्याच नावाची जोरात चर्चा व्हावी, गट तयार व्हावा आणि विरोधकांना गाफील ठेवावं! हे नेते आता सामाजिक बांधिलकीच्या नावाखाली भव्य आयोजन करत आहेत. मंचावरचे भाषण ‘भावनिक’, जेवण ‘जंगी’ आणि मागचा हेतू ‘संपूर्ण राजकीय’ असं या कार्यक्रमांचं त्रिसूत्री गणित स्पष्ट दिसतं.
दुसऱ्या गटातील लोकांना या पार्ट्यांमध्ये ‘नो एंट्री’…
या ‘स्नेहभोजन’ कट्ट्यांवर उघडपणे शक्तिप्रदर्शन सुरू आहे. कोण कुठल्या गटात, कोणत्या पक्षात आणि कोणा सोबत आहे हे ठसवून सांगण्याची धडपड सुरू आहे. कोणाच्या मागे कोण उभं आहे हे दाखवण्यासाठी काही नेते आजी- माजी आमदार, सरपंच किंवा विद्यमान पदाधिकाऱ्यांची उपस्थिती “जाणीवपूर्वक” घडवत आहेत. विशेष म्हणजे, हे इच्छुक उमेदवार या पार्ट्या आपापल्या गटात आणि गणातच घेत असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या गटातील लोकांना या पार्ट्यांमध्ये सामील होता येत नसल्याची खंत इच्छुकांच्याच कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात रस्सीखेच, सोशल मीडियावर हजेरीपट…
सगळ्या कार्यक्रमांचे फोटो, सेल्फी, भाषणाचे व्हिडीओ आणि ‘धन्यवाद आभार’ पोस्ट सध्या सोशल मीडियावर डझनांनी झळकत आहेत. “कार्यकर्त्यांचा प्रचंड प्रतिसाद”, “भविष्यातील लोकनेता” अशा मथळ्यांनी पोस्ट फुलत असल्या, तरी मतदारांचे डोळे आता अधिक पारख झाले आहेत.
मतदारांनी घेतला ‘सातबारा’ वाचनाचा दृष्टिकोन…
गावकरी मात्र आता इतके सरळ नाहीत. “कार्यक्रमात पंगत भरली म्हणजे काम झालं” अशा भ्रमात न राहता लोक आता ‘कुणी काय केलं आणि काय केलं नाही’ याचा ठोस हिशोब मागू लागले आहेत. त्यामुळे जे निव्वळ बिर्याणी, बॅनर आणि बडेजावावर निवडणूक लढवत आहेत, त्यांना हा फॉर्म्युला ‘हंगामी’ ठरू शकतो.
निवडणुका नाहीत पण राजकारण चालूच आहे!…
सध्या निवडणुकांच्या तारखा जाहीर नसल्यामुळे इच्छुक उमेदवार सर्व तोफा उधळून देत आहेत. मात्र निवडणूक आयोगाची शिट्टी वाजली की हे सगळे जंगी प्रयत्न बंद पडणार आणि खरी कसोटी तिथेच लागणार. भोर तालुक्यातील ही निवडणूक आता एवढी सोपी राहिली नाही. पण शेवटी ज्याचं काम त्याचं नाव आणि फक्त झणझणीत जेवण पुरेसं नाही, हे काहींच्या पचण्यात नसेल, पण गावकऱ्यांच्या लक्षात आलंय! त्यामळे ही निवडणूक तालुक्यात रंगतदार, जोरदार आणि काट्याची होणार, यात शंका नाही!