भोर तालुक्यातील प्रलंबित प्रशासकीय कामांचा आमदार संग्राम थोपटेंनी घेतला आढावा; अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भोर पंचायत समिती सभागृह येथे बैठक संपन्न
भोर : भोर तालुक्यातील नागरिकांच्या विविध समस्यांसाठी आमदार संग्राम थोपटे यांनी तालुकास्तरीय विविध शासकीय समितीचे समन्वयक व संबंधित अधिकारी यांच्या समवेत आज बुधवारी(दि. २४ जुलै) भोर पंचायत समिती सभागृह येथे बैठक घेतली. यावेळी आमदार थोपटे यांनी बैठकीत भोर तालुक्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयीन कामकाजाचा आढावा घेतला. यामध्ये तालुक्यातील पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सिंचनाचा प्रश्न, गावपातळीवरील विविध शासकीय निधीच्या माध्यमातून होणारी विकासकामे व तालुक्यात भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत आमदार थोपटे यांनी सविस्तर माहिती घेतली. यावेळी त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तालुक्यातील प्रस्तावित तसेच प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या.
तसेच या प्रसंगी अमृत महाआवास अभियान पुरस्कार, राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत, राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण सर्वोत्कृष्ट बहुमजली इमारत, प्रधानमंत्री आवास योजना – ग्रामीण सर्वोत्कृष्ट घरकुल, राज्य पुरस्कृत आवास योजना – ग्रामीण सर्वोत्कृष्ट घरकुल असे पुरस्कार संबंधितांना प्रदान करण्यात आले.
या आढावा बैठकीस प्रांताधिकारी राजेंद्र कचरे, तहसिलदार सचिन पाटील, भोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब पवार, राजगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गटविकास अधिकारी किरणकुमार धनावडे, मा.जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, तसेच विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी यावेळी उपस्थित होते.