अनधिकृत बांधकामे विकत घेतली,आता भोगा फळे; आंबेगावात तब्बल ५०० सदनिका असलेल्या ११ इमारती जमीनदोस्त
संबंधित इमारतींना यापूर्वी नोटीस देऊन कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यावर पुन्हा बांधकामे झाल्याने नोटीस देण्यात आल्या. त्यानुसार कारवाई करण्यात आली – पुणे महापालिका
पुणे : महापालिकेच्या हद्दीत सदनिका घेताना बांधकामाला महापालिकेची परवानगी आहे काय ? गुंठेवारी झालेली आहे काय ?या प्रश्नांना बगल देऊन ..काय होतेय ? एवढी बांधकामे आहेत अनधिकृत …असे म्हणून महापालिका आणि कायदे यांना धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामे करणारांना आणि ती विकत घेनारांना फळे भोगायची वेळ कधीतरी येतच असते पण त्यास ही काही माध्यमे मात्र अशा बेजबाबदार नागरिकांच्या पाठीशी राहून महापालिकेला दुषणे देण्यात मश्गुल झाल्याचे दिसून आले आहे. आणि हा महापालिकेच्या बांधकाम विभागाचाच कारभार अनागोंदी असल्याचाच केवळ ठपका ठेऊ लागली आहेत.
आंबेगाव ब्रुद्रूकमध्ये अनधिकृतपणे उभारल्या जाणाऱ्या बांंधकामाला महापालिकेने २०२१ मध्ये नोटीस बजावली होती.त्यावेळी संबधितांनी सुरू असलेले बांधकाम थांबवण्याचे नाटक केले. त्यानंतर या बांधकामाच्या तब्बल ११ इमारती उभ्या राहिल्या. आता यातील घरांची विक्रीहि बिनदिक्कतपणे केली आणि आता महापालिकेने तब्बल दोन वर्षांनंतर या सर्वच्या सर्व इमारती गुरूवारी कारवाई करत जमीनदोस्त केल्या आहेत .
या इमारतींमध्ये तब्बल पाचशें सदनिका असून, त्यांची विक्रीही झालेली आहे. त्यामुळे महापालिकेने जवळपास दोन वर्षे हे बांधकाम होत असताना त्याला अभय का दिले असा सवाल करून महापालिकेला घेरले जाते आहे. या इमारतीत सदनिका घेणार्या सर्वसामान्यांची आयुष्यभराची कमाई महापालिकेच्या कारवाईत मातीमोल झाली आहे. अनधिकृत बांधकामांना नोटीस देऊनही महापालिकाच अनधिकृत बांधकामे पाठीशी घालते असा आरोप केला जातो आहे.दरम्यान, आंबेगाव बु।। या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या स.नं.१० पैकी मधील एकुण ११ अनधिकृत इमारतींवर बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ यांचे मार्फत दि.२८ डिसेंबर रोजी परिणाम कारक कारवाई करण्यात आली. आंबेगाव बु।। या भागातील सिंहगड कॉलेजलगतच्या एकुण ११ अनधिकृत इमारतींवर सुमारे ४५०५० चौ. फुटाचे अनधिकृत बांधकाम पाडण्याची कारवाई केली. सदर कारवाई मध्ये बांधकाम विकास विभाग, झोन क्र.२ कडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, पुणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचेसह पोलीस पोलीस कर्मचारी तसेच स्थानिक पोलीसबंदोबस्त व पुणे मनपाचे ७ बिगारी, १ जॉ क्रशर मशिन, ३ जेसीबी, २ ब्रेकर, १ गॅस कटर यांच्या सहाय्याने कारवाई करणेत आली. सदर कारवाई मध्ये सुमारे ११ इमारतींचे एकुण ४५०५० चौ. फुटाचे पाडकाम करण्यात आले. सदर भागामध्ये वारंवार मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे करण्यात येत असल्याने या पुढील काळात सुध्दा प्रशासना तर्फे मोठ्या प्रमाणावर व परिणामकारक कारवाई करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.नागरिकांनी सदनिका विकत घेताना इमारतीस पुणे मनपाची बांधकाम परवानगी तसेच महारेरा कडे नोंदणी केल्या बाबतची खातरजमा करण्यात यावी असे आवाहन पुणे महानगरपालिके तर्फे पुन्हा करण्यात आले आहे.