मुळशीतील भुकूममध्ये वादळी वाऱ्यात कोसळले दोन महाकाय होर्डिंग्स: सुदैवाने जीवित हानी नाही; मात्र दुचाकी, चार चाकी गाड्यांचे मोठे नुकसान.

मुळशी : अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे मुळशी तालुक्यातील भुकूम येथे दोन महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना घडली. कोलाड महामार्गावरील शेल पेट्रोल पंपा जवळ हे होर्डिंग कोसळले. नशीब बलवत्तर म्हणून पाऊस आल्यामुळे होर्डिंग च्या खाली गाड्या लावून नागरिक शेजारी असलेल्या हॉटेलमध्ये थांबलेले होते. परंतु हे होर्डिंग विरुद्ध दिशेला पडले असते तर मोठी जीवित हानी झाली असती. मात्र या ठिकाणी असलेल्या छोट्या छोट्या टपऱ्या मात्र होर्डिंग खाली दबल्या गेल्याने त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

Advertisement

हे दोन्हीही होर्डिंग जुने झालेले होते. त्यामुळे होर्डिंग रिकामे करणे गरजेचे होते. परंतु काही राजकीय लोकांचे स्वतःच्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी लावलेले फ्लेक्स असल्यामुळे हे होर्डिंग वाऱ्याच्या प्रचंड दबावापुढे तग धरू शकले नाहीत. या ठिकाणी अनेक खाद्यपदार्थ विक्री करणारे हॉटेल्स, वाईन शॉप असल्यामुळे या ठिकाणी जास्त वर्दळ असते.

ही घटना घडल्यानंतर तात्काळ बावधन पोलिसांनी घटनास्थळी पोहचून होर्डिंग वेल्डिंगच्या साह्याने कट करून क्रेनने बाजूला केले. पीएमआरडीए च्या आकाशचिन्ह विभागाकडे संबंधित होर्डिंग मालकाने परवानगीसाठी अर्ज दाखल केले असल्याचे सांगितले. कोलाड महामार्गावर असे अनेक महाकाय होर्डिंग आहेत. त्यातील धोकादायक होर्डिंगवर पीएमआरडीएने कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page