नसरापुरातील बनेश्वर मंदिरात ‘शर्ट काढून दर्शन’ घेण्याची प्रथा अखेर रद्द; ग्रामस्थांच्या मागणीला यश
नसरापूर : भोर तालुक्यातील नसरापूर येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र बनेश्वर महादेव मंदिरात ‘पुरुषांनी शर्ट काढूनच दर्शन घ्यावे’, असा नियम गेल्या वर्षापूर्वी मंदिर ट्रस्टमार्फत लागू करण्यात आला होता. मात्र या प्रथेचा ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत ग्रामसभेमार्फत ती रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली होती. यासंदर्भात ग्रामसभेत सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला असून, सदर प्रथा तात्काळ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यादरम्यान ग्रामस्थांच्या वतीने १ मे रोजी नसरापूर ग्रामपंचायतीकडे एक लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. त्यात म्हटले होते की, मंदिरात गेल्या वर्षभरात ही नव्याने सुरु झालेली प्रथा पुरुष भाविकांसाठी अडचणीची ठरत असून, अनेक वेळा भक्तांची कुचंबणा व्हायची. काही भाविकांकडे योग्य कपडे नसल्यामुळे त्यांना दर्शनासाठी गैरसोयीचा सामना करावा लागायचा. अशावेळी महिला भक्तांनाही अस्वस्थतेला सामोरे जावे लागते, असा अनुभवही अर्जात नमूद करण्यात आला होता.
ग्रामस्थांनी आपल्या अर्जात स्पष्टपणे नमूद केले की, देशभरातील केदारनाथ, काशी विश्वेश्वर, महाकालसारख्या प्रसिद्ध शिवमंदिरांमध्ये अशा प्रकारची कोणतीही प्रथा नाही. पुणे जिल्ह्यातही इतरत्र अशी परंपरा आढळून येत नाही. त्यामुळे ही प्रथा केवळ अपवादात्मकच नव्हे, तर भाविकांमध्ये भेदभाव निर्माण करणारी असल्याचे त्यांनी म्हटले.
या विषयावर ग्रामसभेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर ठराव पारित करण्यात आला. ठरावात नमूद करण्यात आले की, भाविकांमध्ये कोणताही भेदभाव न करता समान नियम लागू व्हावेत, हे अत्यंत आवश्यक आहे. शर्ट काढून दर्शन घेणे ही प्रथा समाजाच्या सध्याच्या संवेदनशीलतेच्या पार्श्वभूमीवर अयोग्य असल्याचे स्पष्ट करत, ती त्वरित बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तसेच, संबंधित ठराव मा. सह धर्मादाय आयुक्त, पुणे यांच्याकडे सादर करून, ट्रस्टला आवश्यक त्या सूचना देण्यात याव्यात, अशी शिफारसही करण्यात आली. सरपंच सौ. उषा कदम यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा पार पडली. या ठरावाचे सुचक राजेश कदम तर अनुमोदक प्रज्योत कदम होते.