वीसगाव खोऱ्यातील वणव्यात बालवडीतील शेतकऱ्याचे दीड लाख रुपयांचे नुकसान; आंब्यांची झाडे, बांबूंची बेटे, ठिबक पाइपलाइन आगीच्या भक्ष्यस्थानी 

भोर : तालुक्याच्या दक्षिणेकडील वीसगाव खोऱ्यातील बालवडी येथील गायरान डोंगर परिसरात अज्ञात व्यक्तीने सोमवारी (दि. ३१ मार्च) लावलेला वणवा शेतात आल्याने स्थानिक शेतकरी ॲड. अर्चना संपतराव किंद्रे यांचे जवळपास दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या वणव्यात त्यांच्या शेतातील अनेक आंब्यांची झाडे, बांबूंची बेटे तसेच ठिबक पाइपलाइन पूर्णतः जळून खाक झाले आहेत. सलग दोन वर्ष झाले हा वणवा अज्ञात व्यक्तीकडून पेटवला जात असल्याचा गंभीर आरोप नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, वीसगाव खोऱ्यातील बालवडी (ता.भोर) येथील गायरान डोंगर परिसरात सायंकाळच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून हा वणवा पेटविण्यात आला. हा वनवा जोरदार वारे असल्याने शेजारील शेतात आला. हा वणवा विझवण्यासाठी कोणतेही प्रयत्न न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. समाजकंटकांनी लावलेल्या या वणव्यात हातातोंडाशी आलेल्या फळबागा, बांबूची बेटे तसेच ठिबक पाइपलाइन जळाल्याने शेतकऱ्यांचे खच्चीकरण झाले आहे.

Advertisement

मागील काही वर्षांचा विचार केला असता वीसगाव खोऱ्यातील परिसरामध्ये कोठेही नवीन वनक्षेत्र तयार झाले नाही. याचा विचार केला असता वन विभागाचा नाकर्तेपणा समोर आला असून, वनक्षेत्रा लगतच्या परिसरात कोठेही जाळरेषा काढल्या नाहीत. तसेच वन क्षेत्रालगत असलेल्या शेत जमिनींचे वणव्यात नुकसान होऊ नये म्हणून कोणत्याही उपाययोजना केल्याचे दिसत नसल्याचे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले. परंतु या वणव्यास व त्यातून झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण हा यक्षप्रश्न मात्र या निमित्ताने उपस्थित झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

“माझ्या खाजगी शेतीचे नुकसान झाले हे वाईटच. परंतु या डोंगररांगांमधील दुर्मिळ वनस्पती, तसेच काही पक्षी देखील या वणव्यात नष्ट झाले आहेत. निसर्गाची ही हानी कोण भरून काढणार? आजकाल झाडांची संख्या कमी झाल्यामुळे तापमान वाढत आहे. पूर्वी जसा भोर तालुका हिरवागार दिसत होता तसाच तो पुन्हा व्हावा. वन वाचवण्यासाठी वन विभागाकडून वृक्षारोपण व वेळोवेळी गावपातळीवर जनजागृती करण्यात यावी. तसेच मुख्य म्हणजे शेतकरी बांध पेटवतात तेथून खरी वणव्याला सुरवात होते. वणवा लावणाऱ्या व्यक्तींवर कडक कारवाई व्हावी”, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी ॲड. अर्चना संपतराव किंद्रे यांनी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page