डोंगराला लागलेला वनवा घरापर्यंत पोहोचल्याने चिखलगाव येथील चार घरे जळून खाक
भोर : तालुक्याच्या दक्षिणेकडील आंबवडे खोऱ्यातील चिखलगाव येथील वरची बौद्ध वस्ती येथे रावडी गावच्या बाजूकडून डोंगराला लागलेला वनवा घरापर्यंत आल्याने चार घरांना आग लागून घरे जळून खाक झाल्याची घटना सोमवारी (दि.३१ मार्च) सायंकाळी घडली. या घटनेत घर संसार पूर्णता जळून खाक झाला असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार रावडी या गावाच्या बाजूकडून डोंगराला वनवा लागला होता. हा वनवा जोरदार वारे असल्याने चिखलगाव (ता.भोर) येथील वरची बौद्ध वस्ती येथील घरांजवळ येऊन आबू ईश्वरा गायकवाड, काळू खंडू गायकवाड, खंडू धोंडीबा गायकवाड व काळू आबू गायकवाड यांच्या घरांना आग लागली. चिखलगाव येथील तरुण तसेच ग्रामस्थांनी घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवण्याचा शर्तीने प्रयत्न केला. मात्र पाण्याची कमतरता असल्याने घरे पूर्णता जळून आगीत खाक झाली. घरांना लागलेल्या आगीमुळे घरातील कपडा लत्ता, धान्य, जनावरांचा चारा, घरातील चीज वस्तू जळून गेल्या. या घटनेमुळे नुकसानग्रस्त नागरिक रस्त्यावर आल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले.