मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा संपन्न; पाऊस आणि शेतकरी सुखासाठी घातले साकडे
पंढरपूर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात भक्तीचा महापूर उसळला आहे. या भक्तीमय वातावरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक विठूरायाची महापूजा केली. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासह अनेक मंत्री-खासदार उपस्थित आहेत. भरपूर पाऊस पडू दे आणि शेतकरी सुखी-समाधानी राहू दे असं साकडं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पांडुरंगाला पूजेदरम्यान घातले.
आषाढी एकादशीनिमित्त यंदा विठ्ठल-रखुमाईच्या शासकीय पुजेचा मान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळाला. त्यांच्या सोबतच नाशिक जिल्ह्यातील बाळू शंकर अहिरे व आशा बाळू अहिरे या वारकरी दाम्पत्याला शासकीय महापूजेसाठी उपस्थित राहण्याचा मान मिळाला. अहिरे दाम्पत्य हे नाशिक जिल्ह्यातील अंबासन येथील रहिवासी आहे. हे दाम्पत्य गेल्या १६ वर्षांपासून अखंडपणे पंढरपूरच्या वारीत सहभागी होत वारी करत आहेत. दरम्यान, आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भविकांची मांदियाळी बघावयास मिळत आहे. जवळपास १५ लाख भाविक पांडुरंगाच्या दर्शनासाठी पंढरपुरा दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तिरावर स्नानासाठी पहाटेपासूनच भाविकांची गर्दी झाली आहे.
मानाचे वारकरी कोण आणि कसं ठरवतात?
मानाचे वारकरी ठरवण्याचा अधिकार पुर्णपणे मंदिर समितीला आहे. शासकिय पुजेचा प्रकार हा समिती अस्तित्वात आल्यानंतर आला. १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुजा केली जाते तर त्यांच्यासोबत मानाचे वारकरी पुजेस उपस्थित असतात. आणि ते निवडण्याचा अधिकार मंदिर समितीकडे देण्यात आला आहे. विठ्ठलाची पुजा हि पहाटे पार पडते. मुख्यमंत्री मंदिरात उपस्थित राहिले की मंदिराचे दरवाजे बंद केले जातात. त्यानंतर पुजेची तयारी चालू होते. अशा वेळी दर्शनरांगेत पुढे उपस्थित असणाऱ्या दांपत्याला हा मान दिला जातो. जे दांपत्य दर्शनरांगेत समोर असेल त्यांना मुख्यमंत्र्यांबरोबर पुजा करण्यासाठी बोलावलं जातं. त्यानंतर त्या दांपत्याचा मंदिर समितीमार्फत सत्कार देखील केला जातो.
पाऊस आणि शेतकरी सुखासाठी मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे
दरम्यान, राज्यात भरपूर पाऊस पाणी पडत शेतकरी सुखी-समाधानी राहू दे. राज्याती सर्व क्षेत्राची प्रगती होत प्रगतीला अधीक चालना मिळवी, असं साकडं आपण पंढरपूरच्या पांडुरंगाला घातल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. परंपरेनुसार, मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा केली. पहाटे अडीच वाजेपासून या शासकीय पूजेला सुरुवात झाली होती.