भाटघर धरणातून १६३१ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू; प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, नदीपात्रात प्रवेशास बंदी
भोर : तालुक्यातील भाटघर धरण (येसाजी कंक जलाशय) येथे पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असून आज शनिवारी (दि. २६ जुलै) धरण ९४ टक्के भरले. त्यामुळे सकाळी आठ वाजल्या पासून धरणाच्या विद्युत निर्मिती केंद्रामधून १६३१ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती पुणे पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता दि. म. डुबल यांनी दिली आहे.
या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. नदीपात्रात कोणीही उतरणे टाळावे, अशी सूचना देण्यात आली असून, तेथील सुरू असलेली कामे, बांधकाम साहित्य, यंत्रसामग्री आणि कामगारांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आदेश दिले आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास पुढील काही तासांत विसर्गात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी, असेही त्यांनी सूचित केले आहे.
तसेच, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी लावलेले पंपिंग सेट देखील संभाव्य पाणी विसर्गाच्या धोक्यापासून सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. सखल भागात राहणाऱ्या नागरिकांना तात्काळ सूचना देऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचना गांभीर्याने घ्याव्यात आणि कोणताही धोका टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.