आरटीओच्या ‘वायुवेग’ पथकाच्या तत्परतेने शिंदेवाडीतील अपघातग्रस्त तिघांचे वाचले प्राण
मुख्य संपादक : दिपक महांगरे.
खेड शिवापूर : पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी (ता. भोर) हद्दीत रात्रीच्या वेळी दुचाकी घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या तिघांना हायवे तपासणी करणाऱ्या आरटीओच्या वायुवेग पथक क्र. ३ ने तातडीने मदत करत शिवापूर येथील रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे अत्यवस्थ असलेल्या दुचाकीचालकाचे प्राण वाचले तर दुचाकीवरील सहप्रवासी असलेल्या दोन महिलांनादेखील तातडीने उपचार मिळाले.
प्रादेशिक परिवहन पुणे कार्यालयाचे वायुवेग पथक क्र. ३ पुणे सातारा महामार्गावर सोमवारी (दि. २१ जुलै) तपासणी करत असताना रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिंदेवाडी जुन्या बोगद्याकडून आलेली एक दुचाकी रस्त्यावरील खडीमुळे घसरली.
या अपघातात दुचाकी चालक जमेल दफेदार (रा. भोर शहर) दुचाकी वरून पडून रस्त्याच्या कठड्याला धडकल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. तर दुचाकीवर मागे बसलेल्या कल्पना ठाकर आणि गुड्डी रामलाल चव्हाण (रा. भोर शहर) दोन महिला रस्त्यावर पडल्या त्यांना देखील दुखापत झाली. आरटीओच्या वायुवेग पथकातील मोटार वाहन निरीक्षक समीर शिरोडकर, सहायक निरीक्षक श्वेता नरखेडकर, वाहन चालक महादेव महाले यांनी अपघातग्रस्त दुचाकीवरील तिघांना तातडीने त्यांच्या वाहनाने शिवापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे दुचाकी चालक दफेदार यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगून डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केल्याने त्यांचा धोका टळला. तर बरोबरच्या दोन महिलांवरदेखील उपचार करण्यात आले.
“दुचाकी चालक दफेदार यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्यांच्या डोक्यात रक्तस्राव झाला होता. लिव्हरला गंभीर दुखापत झाली होती. गोल्डन अवरमध्ये वेळीच उपचार करून त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. वेळीच त्यांना रुग्णालयात आणले गेले नसते तर त्यांच्या प्राणास धोका निर्माण झाला असता. आरटीओ पथकाने तातडीच्या मदतीने त्यांचे प्राण वाचले.”
– डॉ. अमेय कर्णिक.