विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खेड-शिवापूर टोलनाक्यावर मोठी कारवाई; ५ कोटी रोख रक्कम घेऊन जाणारी गाडी पोलिसांच्या ताब्यात; राजगड पोलिसांची कारवाई
खेड शिवापूर : राज्यात निवडणुकीच्या अनुषंगाने ठिकठिकाणी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली असून, संशयास्पद वाटणाऱ्या वाहनांची पोलिसांकडून झडती घेतली जात आहे. याच अनुषंगाने पुणे-सातारा महामार्गावरील खेड शिवापूर टोल नाक्यावर आज सायंकाळच्या सुमारास एका वाहनामधून काही रक्कम नेण्यात येत असल्याची गोपनीय माहिती राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांना मिळाली. त्यानुसार राजगड पोलिसांनी सापळा रचून संबंधित वाहनाची झडती घेतली असता त्या वाहनामध्ये रोख रक्कम राजगड पोलिसांना मिळून आली.
सदर रक्कम आणि इनोव्हा क्रिस्टा कंपनीचे चारचाकी वाहन क्रमांक एमएच ४५ एएस २५२६ पोलिसांनी कारवाईत हस्तगत केले असून, घटनास्थळी पोलीस प्रशासनातील अधिकारी वर्ग तसेच तहसिदार, प्रांतअधिकारी आदी दाखल झाले असून राजगड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.