पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणात शून्य पाणीसाठा; पुरंदर, बारामती ला फटका बसणार
पुरंदर : गेल्या तीन महिन्यापासून पुरंदर तालुक्यातील नाझरे धरणात पाणी नाही. धरण कोरडे पडले आहे. नाझरे धरणाची क्षमता ०.८५ टीएमसी आहे. गतवर्षी या धरणात अवघा ३३४ मिलिमीटर पाऊस झाला होता. गतवर्षी या धरणात ०.३२ टीएमसी पाणीसाठा होता. आता धरणात शून्य पाणीसाठा आहे. या धरणातून पुरंदर आणि बारामती तालुक्याची पाण्याची तहान भागवली जाते. पण आता धरणात पाणीसाठाचं नसल्याने करायचे काय असा प्रश्न इथल्या गावकऱ्यांना पडला आहे.
नाझरे धरण हे पुरंदर तालुक्यात आहे. या धरणावर पुरंदर आणि बारामती तालुक्यातील जवळपास २२ गावे अवलंबून आहेत. या धरणात पाणी नसल्यामुळे यागावातील लोकांची स्थिती बिकट बनली आहे. नळ योजनेतून याच धरणातून पाणी पुरवठा केला जातो. पण आता हे धरण कोरडे ठाक पडले आहे. जेजुरी येथील खंडेराया सोमवती अमावस्या निमित्त शाही स्नानासाठी भाविक नाझरे धरणात येत असतात. परंतु या वर्षी भाविकांची देखील पाणी नसल्यामुळे गैरसोय झाली आहे.
एकंदरीतचं नाझरे धरण कोरडे पडल्याने पुरंदर व बारामती तालुक्यातील अनेक गावांना टँकरव्दारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. दुष्काळासारखी स्थिती यागावात निर्माण झाली आहे. या भागात पाऊसही गेल्या काही वर्षात कमी झाला आहे. त्यामुळे धरण पुर्ण क्षमतेने भरलेले नाही. अशा स्थितीत अनेक गावातील लोक हे स्थलांतर करत असल्याचेही समोर आले आहे. जवळच्या शहरात राहून मिळेल ते काम त्यांना करावे लागत आहे. हा पाणी प्रश्न लवकर सोडावावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे.