कापूरहोळ-भोर रस्त्याच्या श्रेयवादाचा “सोशल वॉर”; महायुती समर्थकांकडून नितीन गडकरींचे आभार, तर हा निधी केंद्र सरकारचा नसून राज्य सरकारचा असल्याचे थोपटे समर्थकांकडून प्रत्युत्तर

भोर : सोशल मिडियावर महायुतीतील एका समर्थकाने कापूरहोळ-भोर रस्त्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आणि त्यावरून मिडियावर “सोशल वॉर” पहायला मिळाला. सध्या कापूरहोळ ते भोर होत असलेल्या १० मीटर रुंदीच्या काँक्रीटच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसेच पुढे जात मांढरदेवी-वाई-सुरुर असेही या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्यासाठी एकूण ३४० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. परंतु हा निधी नक्की कोणी आणला यावरूनच तालुक्यात महायुती समर्थक व आमदार संग्राम थोपटे समर्थकांमध्ये “सोशल वॉर” पहायला मिळाला.

काय होता “तो” व्हिडिओ?
त्या व्हिडिओ मध्ये “भोरला समृद्ध करणारा मार्ग” असा मजकूर लिहून संपूर्ण रस्त्याचे काम रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले असल्याबाबत त्यांचे आभार मानण्यात आले होते. काही क्षणातच हा व्हिडिओ भोर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. आणि सगळीकडे याचीच चर्चा पहायला मिळाली. महायुतीच्या सर्वच समर्थकांच्या “व्हॉट्सॲप स्टेटस” वर हा व्हिडिओ पहायला मिळाला. तसेच त्यांच्या कडून सर्व राजकीय सामाजिक सोशल मीडियावर तो फॉरवर्ड करण्यात आला.

Advertisement

आमदार संग्राम थोपटे समर्थकांकडून “त्या” व्हिडिओला प्रत्युत्तर
त्यांनतर काही वेळात च आमदार संग्राम थोपटे समर्थकांकडून त्याच रस्त्याचा व्हिडिओ सोशल मीडिया वर फिरू लागला. त्यामध्ये “आमदार संग्रामदादा थोपटे यांच्या प्रयत्नातून कापूरहोळ ते भोर रस्त्याचे काम प्रगतीपथावर” असा मजकूर लिहिलेला पहायला मिळाला. तसेच विधानभवनात आमदार संग्राम थोपटेंनी या रस्त्याविषयी कायम पाठपुरावा करत मागणी करत असतानाचा भाषणाचा व्हिडिओ त्यांच्याकडून पोस्ट करण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय यांच्याशी वारंवार केलेल्या पत्रव्यवहाराचे पत्रके सुद्धा पोस्ट करण्यात आली. तसेच हा निधी केंद्र सरकारच्या माध्यमातून आलेला नसून हा निधी महाराष्ट्र राज्य सरकारच्या माध्यमातून आला असल्याचाही व्हिडिओ सोशल मीडियावर थोपटे समर्थकांकडून पोस्ट करण्यात आला.

मात्र या संपूर्ण प्रकरणात भोर तालुक्यातील जनतेने कापूरहोळ-भोर रस्त्याच्या श्रेयवादाचा चाललेला “सोशल वॉर” अनुभवला. या व्हिडिओच्या निमित्ताने मात्र तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघाल्याचे पहायला मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page