सासवडमध्ये एक लाख रुपयांची लाच घेताना लाचखोर वनरक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या रंगेहाथ ताब्यात

सासवड : वनविभागाच्या जागेत खड्डा खोदल्यामुळे गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पुरंदर तालुक्यातील सासवड येथील वनरक्षकला लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) करण्यात आली. गोविंद रामेश्वर निर्डे (वय ३२ वर्ष, नेमणुक वनपरिक्षेत्र कार्यालय, सासवड वनविभाग, जि. पुणे) असे लाच घेताना पकडलेल्या वनरक्षकाचे नाव आहे.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील तक्रारदार यांनी त्यांच्या पाळीव जनावरासाठी मुरघास तयार करण्यासाठी वनविभागाच्या जागेत खड्डा खोदला होता. वनविभागाने सांगितल्यानंतर तक्रारदार यांनी तो खड्‌डा बुजवला. परंतु, लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदारावर वन अधिनियमानुसार गुन्हा नोंदवून कारवाई न करण्यासाठी त्यांच्याकडे दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने तीन एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली होती.

Advertisement

प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने चार एप्रिल रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता, लोकसेवक गोविंद निर्डे यांनी तक्रारदाराकडे त्यांच्याविरुद्ध वन जमिनीवर केलेल्या अतिक्रमणासाठी वन अधिनियमानुसार गुन्हा दाखल न करण्याकरीता सुरुवातीस दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी करुन, तडजोडीअंती एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. शुक्रवारी (दि. ४ एप्रिल) निर्डे यांनी तक्रारदाराकडून एक लाख रुपयांच्या लाचेची रक्कम श्रीनाथ रसवंती गृह (वीर फाटा, सासवड, जि. पुणे) येथे पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. निर्डे यांच्याविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सदरची कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे. या घटने बाबतचा अधिक तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पुणे पोलिस उपअधीक्षक भरती मोरे करत आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page