मुंबईच्या कुर्ला स्टेशन जवळ भीषण अपघात; भरधाव बेस्ट बसने अनेकांना उडवले; तिघांचा मृत्यू तर १७ गंभीर
कुर्ला : बेस्ट उपक्रमाच्या भाडे तत्वावरील एका बसवरील चालकाने सोमवारी रात्रीच्या सुमारास बेदरकारपणे बस चालवत कुर्ला , सीएसटी रोड येथे रिक्षा आणि इतर वाहनांना जोरदार धडक दिली. या घटनेत रिक्षातील प्रवासी, काही पादचारी असे किमान २० जण गंभीर जखमी झाले आहेत.
त्यापैकी ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बसचा ब्रेक फेल झाल्याने घटना घडल्याचे सांगण्यात येते. सदर जखमींना तातडीने नजीकच्या भाभा आणि सायन रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. मात्र अपघातानंतर बस चालकाने बस सोडून पळ काढल्याचे सांगण्यात येते.
मिळालेल्या माहितीनुसार, बेस्ट उपक्रमाची कुर्ला ते अंधेरी या मार्गावर धावणाऱ्या बस क्रमांक 332 या भाडे तत्वावरील बसच्या चालकाचे रात्री 9.30 वाजताच्या सुमारास कुर्ला ( पश्चिम), आंबेडकर नगर, बुद्ध कॉलनी, महापालिका एल वार्ड कार्यालय, एस जी बर्वे मार्ग, अंजुमन ए इस्लाम शाळेसमोर एका रिक्षाला आणि आणखीन काही वाहनांना, पादचारी यांना जोरदार धडक दिली. बसचा ब्रेक फेल झाल्याने सदर दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येते.
अचानकपणे घडलेल्या या अपघातात रिक्षाचा चक्काचूर झाला आहे. रिक्षातील प्रवासी, रिक्षा चालक आणि काही पादचारी असे किमान 20 जण गंभीर जखमी झाले. या सर्व जखमींना तातडीने तेथील नागरिकांनी नजीकच्या भाभा आणि सायन रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेले. मात्र त्यापैकी 3 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत मृतांचा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.