जमीन विक्रीच्या कमिशनचे पैसे न दिल्यामुळे ज्येष्ठाला घरात घुसून मारहाण; भोर तालुक्याच्या कासुर्डी गु.मा. येथील घटना, राजगड पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल
कापूरहोळ : जमीन विक्रीचे कमिशन दिले नाही म्हणून दोघांनी कासुर्डी गु.मा. (ता. भोर) येथे एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण केली आहे. याबाबत राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शंकर सीताराम मालुसरे (वय ६२ वर्ष, रा. कासुर्डी गु.मा.) यांनी तक्रार दाखल केली आहे. दिलेल्या तक्रारीनुसार तुषार ओव्हाळ (रा. तेलवडी, ता. भोर) व संग्राम जगताप (रा. संगमनेर-माळवाडी, ता. भोर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जमीन विक्रीच्या कमिशनचे पैसे दिले नाहीत, याचा राग मनात धरून तुषार ओव्हाळ याने बुधवारी(दि. २ एप्रिल) सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मालुसरे यांना त्यांच्या कासुर्डी गु.मा. येथील राहत्या घरी जाऊन लाकडी बांबूने हातापायावर मारहाण करून हात फ्रॅक्चर करून गंभीर दुखापत केली, तर संग्राम जगताप याने भांडणे सोडवण्यासाठी येणाऱ्या लोकांना शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर घटनेबाबत दोघांविरोधात राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार मयूर निंबाळकर पुढील तपास करत आहेत.