निनाद महाराष्ट्र न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट; झिपलाइनिंग करताना झालेल्या तरुणीच्या मृत्यूप्रकरणी अखेर राजगड वॉटर पार्क मालक, चालकासहित ७ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुख्य संपादक : दिपक महांगरे

नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील वरवे खुर्द (ता. भोर) गावच्या हद्दीतील राजगड वॉटर पार्क रिसॉर्ट येथे आपल्या कुटुंबीयांसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरल अरूण आटपाळकर (रा. सेलेशिया पार्क, नऱ्हे(धायरी), पुणे) या २८ वर्षीय तरुणीचा दि. १८ एप्रिल रोजी झिपलाइनिंग करताना ३० फूट उंचीवरून कोसळून दुर्दैवी मृत्यू झाला होता. यांनतर निनाद महाराष्ट्र न्युजने या घटनेची प्रथम दखल घेत वृत्त प्रसिद्ध करत राजगड वॉटर पार्कमधील सुरक्षा व्यवस्था आणि निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत रिसॉर्ट चालक व मालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. 

तरुणीच्या मृत्यूस राजगड वॉटर पार्क मालक, चालक व व्यवस्थापन विभाग जबाबदार असल्याचे कुटुंबीयांचे आरोप

झिपलाईनिंग करताना ३० फूट उंचीवर असून सुद्धा मयत तरुणीला सुरक्षेसाठी डोक्यात हेल्मेट घालायला दिले नव्हते. ज्या ठिकाणावरून ही तरुणी कोसळली, त्या ठिकाणी सुरक्षा ग्रील, सुरक्षा जाळी लावलेली नव्हती. ज्या स्टुलवर ती उभी राहिली तो स्थिर नसल्याने हालल्यामुळे तिचा तोल जावुन ती रेलींगवरून खाली पडल्याने तिचे डोक्यास गंभीर दुखापत झाली. यानंतर आटपाळकर कुटुंबीयांनी रिसॉट चालक व मॅनेजर यांना ॲम्बुलन्स बोलवण्यास सांगितली, परंतु सदर ठिकाणी कोणतीही ॲम्बुलन्स व प्रथमोपचार किट उपलब्ध नसल्याने खासगी वाहनाने दवाखान्यात उपचारासाठी नेई पर्यंत जास्त रक्तस्त्राव झाल्याने तरुणीचा मृत्यू झाला असल्याचे आरोप मयत तरुणीच्या कुटुंबीयांनी केले. 

रिसॉर्ट चालक व मालकासहित ७ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Advertisement

वरील सर्व बाबी लक्षात घेत राजगड पोलिसांनी अखेर रिसॉर्ट चालक व मालकासहित ७ जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिली आहे. त्यामध्ये रिसॉर्ट मालक, चालक तसेच मॅनेजर अनिल जाधव, मॅनेजर दिलीप गोसावी, कामगार विशाल कुमार, श्रीरमेश कुमार, स्वप्निल दिवळे यांचा समावेश आहे. रिसॉर्ट मालक व चालकाचे नाव अद्याप माहिती नसल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. 

प्रशिक्षित मार्गदर्शक, सुरक्षिततेच्या पायाभूत गोष्टींचं पालन करण्यात आले नाही

या प्रकरणामुळे राजगड वॉटरपार्कमधील सुरक्षेच्या नियमांकडे केलेल्या दुर्लक्षाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. झिपलाईनिंगसारख्या साहसी खेळांमध्ये अत्यंत काटेकोर आणि प्रशिक्षित मार्गदर्शनाची आवश्यकता असते. मात्र, या ठिकाणी ना योग्य ट्रेनर होते ना सुरक्षिततेच्या पायाभूत गोष्टींचं पालन करण्यात आलं होतं, असा आरोप तरुणीच्या कुटुंबियांसह अनेकांनी केला. कुटुंबियांच्या डोळ्यांदेखत झालेल्या या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

या घटनेबद्दल माध्यमांवर उमटल्या तीव्र प्रतिक्रिया; प्रशासनानेही घेतली गंभीर दखल

सामाजिक माध्यमांवरही या घटनेबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटत असून संबंधित वॉटरपार्कवर कायदेशीर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. राजगड पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, वॉटरपार्कच्या व्यवस्थापनाकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची चौकशी केली जात आहे. प्रशासनानेही या घटनेची गंभीर दखल घेतली असून अशा प्रकारचे अपघात पुन्हा होऊ नयेत यासाठी वॉटर पार्क्सवर नवीन सुरक्षा नियम लागू करण्याचा विचार सुरु असल्याचे समजते.

पुणे ग्रामीण जिल्ह्यामध्ये जे जे एडवेंचर्स ठिकाणे व कॅम्प सुरू आहेत. तिथे सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना आहेत की नाहीत याचा आढावा घेतला जाणार आहे. या प्रकरणात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवला असून पुढील तपासात राजगड वॉटर पार्क बद्दलच्या सर्व गोष्टी स्पष्ट होतील.

       – पंकज देशमुख, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page