पुणे-सातारा महामार्गावरील कामथडी गावच्या हद्दीत दुचाकीच्या धडकेत हिवरे (पुरंदर) येथील एकाचा मृत्यू; चालकावर गुन्हा दाखल
पुणे : पुणे-सातारा महामार्गावर कामथडी (ता.भोर) गावच्या हद्दीत पायी रस्ता क्रॉस करत असणाऱ्या व्यक्तीला दुचाकीची धडक बसल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राजगड पोलिसांनी आयुश गणेश शेलार (वय २२ रा. सुंदरवाडी, ता. महाड ) या दुचाकी चालकावर गुन्हा दाखल केला आहे. जयसिंग शंकर वैराट (वय ६४, रा. हिवरे, ता. पुरंदर) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
या बाबत राजगड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी (दि. १२) रोजी दुपारी चार वाजण्याच्यां सुमारास कामथडी गावचे हद्दीत पुणे-सातारा महामार्गावर पुणे बाजू कडून सातारा बाजू कडे जाताना बुलेट गाडी (एम. एच ०४ जे. आर ०९०९) वरील चालक आयुश शेलार यानी रस्ता क्रॉस करत असणाऱ्या जयसिंग वैराट यांना जोरात धडक दिल्याने हा अपघात झाला. बुलेटचालकाने ॲम्ब्युलन्सला पाचारण करून जखमीला सिध्दिविनायक हॉस्पिटल येथे उपचारकामी नेले. मात्र उपचारा दरम्यान शेलार मयत झाले. छाया शिवाजी पाटोळे यांनी याबाबत फिर्याद दिली असून आयुश गणेश शेलार (वय २२ रा. सुंदरवाडी, ता. महाड ) याच्यावर रविवारी (दि. १४ जानेवारी) रोजी राजगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार सागर कोंढळकर करीत आहेत.