रोडरोमिओंचे फोटो फ्लेक्सवर टांगणार – पोलिस आयुक्त अमितेश कुमार
पुणे : गणेशोत्सवात महिला-तरुणींची छेड काढणार्या रोडरोमियोंचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी जालीम उपाय शोधला असून, त्यांचे फोटो काढून भर चौकात फ्लेक्सवर लावले जाणार आहेत. एवढेच नाही तर रोडरोमिओंची परेड देखील पोलिस घेणार आहेत. त्यामुळे महिलांची छेडछाड कराल तर सावधान असा सज्जड दमच पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी रोडरोमियोंना दिला आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाची ख्याती सर्वदूर आहे. हा उत्सव पाहण्यासाठी देश विदेशातून नागरिक येत असतात. मध्यवस्तीत उत्सवकाळात भाविकांची मोठी गर्दी असते. त्याच गर्दीचा फायदा घेत रोडरोमिओंकडून महिला-तरुणींची छेड काढण्याचे प्रकार घडतात. त्यापार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पोलिसांना सुचना दिल्या आहेत. सुरक्षेच्यादृष्टीकोनातून पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते आहे. महिलांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते आहे. त्यासाठी महिला पोलिस, दामिनी मार्शलची पथके तैनात करण्यात येणार आहेत. तसेच गुन्हे शाखेच्या पथकांना छेडछाड करणार्या रोडरोमिओंची कुंडली तयार करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. महिलांच्या सोबत गैरकृत्य करताना कोणी आढळून आले तर पोलिस त्यांचे फोटो काढून शहरात फ्लेक्सवर नावासह लावणार आहेत. तसेच त्यांची रस्त्यावर परेड सुद्धा घेणार आहेत.