केळवडेतील पेट्रोल पंप चालकास खंडणीची मागणी केल्याप्रकरणी स्थानिक नेत्यावर राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नसरापूर : पुणे-सातारा महामार्गावरील केळवडे (ता. भोर) गावच्या हद्दीतील बी.पी.सी.एल. पेट्रोल पंप चालकास खंडणीची मागणी केल्या प्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल चांगदेव पवार (वय ४० वर्ष, रा. केळवडे ता. भोर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबत पेट्रोल पंप चालक दिनेश दत्तात्रय मानुरकर (वय ३५ वर्ष, रा. लोणीकंद, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केळवडे (ता. भोर) गावच्या हददीतील बी.पी.सी.एल. पेट्रोल पंपावर शनिवारी (दि. १० मे) सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपी राहुल पवार यांनी त्यांच्या स्कॉर्पिओ (एम.एच.१२.के.झेड.४९१२) मधुन येवुन कापुरहोळ (ता. भोर) येथील महिलेस पंपावर कामावर घ्या. पंपावर झोल करा, मी इथला नेता आहे. असे म्हणुन पेट्रोल पंप चालकास शिवीगाळ दमदाटी केली. यावेळी पवार यांनी गाडीतील काठी बाहेर काढुन दहशत निर्माण करून खंडणीची मागणी केली. पंपावर झोल करा आणि मला ५ हजार रूपये दर महिन्याला द्या. नाहीतर पंप चालु देणार नाही. असे म्हणुन पेट्रोल पंप चालकास जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. सदर घटनेबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार सागर गायकवाड करत आहेत.