भोर तालुक्यातील न्हावी येथील अंगणवाडी इमारत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे चौकशीच्या फेऱ्यात; संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना आवश्यक कागदपत्रासह आज उपस्थित राहण्याचे चौकशी समितीचे आदेश
सारोळा : भोर तालुक्यातील न्हावी ३२२ व न्हावी १५ येथे २०१५-१६ रोजी बांधण्यात आलेली अंगणवाडी नवी इमारत चौकशीच्या फेऱ्यात सापडली आहे. हे बांधकाम करताना गुणवत्तेशी तडजोड केली गेल्याने याबाबत येथील स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. लाखो रुपये खर्चून बांधलेल्या अंगणवाडी इमारतीचे बांधकाम अत्यंत सुमार दर्जाचे करण्यात आले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या इमारतीच्या भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे भविष्यात या इमारतींना धोका उत्पन्न होऊ शकतो. सदर इमारतीचे बांधकाम समाधानकारक झालेले नाही. बांधकाम करताना महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. सदर इमारत ही बालकांना बसण्यासाठी अत्यंत धोकादायक असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारावर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
सदर अंगणवाडी इमारतीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी वारंवार स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. अखेर या इमारतीचे बांधकाम दर्जा तपासण्यासाठी व चौकशी करण्यासाठी मा. मुख्यकार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे यांच्याकडील आदेशान्वये विशाल कोतागडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी-मावळ यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार सदर चौकशी समिती आज गुरुवार (दि.१ फेब्रुवारी) रोजी ग्रा. पं. न्हावी ३२२ व न्हावी १५ (ता. भोर जि. पुणे) या ठिकाणी भेट देणार आहे. त्यामुळे या संबंधित अधिकारी व कर्मचारी यांना सदर ठिकाणी आवश्यक त्या कागदपत्रासह उपस्थित राहण्याचे आदेश चौकशी समितीने दिले आहेत.