भले शाब्बास! मुळशीतील माजी सरपंच महिलेने तब्बल २१ वर्षानंतर दिली बारावीची परिक्षा; निकाल असा लागला की सगळेच करतायत कौतुक
मुळशी : शालेय शिक्षण घेत असताना अनेकांच्या मनात शिक्षणाची आवड असते. परंतु घरच्या हालाकीच्या परिस्थितीमुळे काहींना शिक्षण अर्धवट सोडावे लागते. मात्र परत कधी संधी मिळाली तर ते त्या संधीच सोने करून दाखवितात. मुळशी तालुक्यातील एका महिलेला सुद्धा घरच्या परिस्थितीमुळे असेच शालेय शिक्षण अर्धवट सोडावे लागले होते. परंतु शिक्षणाची आवड असल्याने या महीलेने तब्बल २१ वर्षांनंतर १२ वीची परीक्षा दिली. त्यामध्ये त्या ७१.१७ टक्केवारी घेऊन उत्तीर्णही झाल्या.
सुरेखा संदीप दिघे (वय ३९ वर्ष) असे या महिलेचे नाव असून मुळशी तालुक्यातील भांबर्डे गावच्या त्या माजी सरपंच आहेत. पौड(ता. मुळशी) येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात त्यांनी ही परीक्षा दिली. सुरेखा दिघे यांनी लग्नानंतर १२ वी मध्ये घसघशीत यश संपादन करून तालुक्यातील महिला गृहिणीं समोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. उत्तीर्ण झाल्यामुळे मुळशीमध्ये त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
“मला शिक्षणाची आवड होती. परंतु, घरच्या परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता आले नाही. यामध्ये पतीने मला साथ दिली आणि घरच्यांची परवानगी असल्याने मला परीक्षा देण्यासाठी अभ्यास करता आला. आता मी १२ वी उत्तीर्ण झाले असून पुढचे शिक्षण देखील चालूच ठेवणार आहे.”
– सुरेखा संदीप दिघे (माजी सरपंच भांबर्डे, ता. मुळशी).