सातारा जिल्हा परिषदेचे ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान राज्यभर राबविण्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या सूचना; कापूरहोळच्या ‘वीर दुधाई धाराऊ-माता गाडे पाटील’ यांचे नाव पुन्हा एकदा गावा-गावांत घेतले जाणार

सातारा(प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी व संभाजी महाराजांना ज्यांनी जन्म दिला अशा सईबाई राणीसाहेब यांना बाळंत व्याधी झाली आणि शंभूराजांच्या प्रकृतीला मोठा धोका निर्माण झाला. जास्त काळ भुकेपोटी राहिले तर त्यांच्या प्रकृतीमध्ये अजून बिघाड होऊ शकतो, ही धोक्याची सूचना राजवैद्यांनी आऊसाहेबांसमोर मांडली. आऊसाहेबांच्या समोर उभे राहिलेल्या या संकटात कापूरहोळच्या तुकोजी गाडे पाटलांच्या पत्नी धाराऊ गाडे पाटील या शंभूराजांच्या “दुधाई” बनल्या. केवळ त्या “दुधाई” न बनता त्यांनी शंभूराजांसाठी आपले सारे जीवन समर्पित केले. त्यांनी शंभूराजांचे यथेच्छ संगोपन केले. अशा वीर दुधाई धाराऊ-माता गाडे पाटलांचा इतिहास आपणा सर्वांना माहिती आहेच. 

हाच इतिहास डोळ्यासमोर ठेऊन सातारा जिल्हा परिषदेने स्तनपानाबाबत जो नावीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला त्यास ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ हे नाव दिले. हे अभियान २०२१ मध्ये सुरू केले आहे. यामधून जिल्ह्यात स्तनपान आणि शिशुपोषण विषयाची सामाजिक लोकचळवळ निर्माण करण्याचा उद्देश होता; कारण, बालकाच्या शारीरिक विकासात स्तनपानाची भूमिका मोलाची असते. परंतु, आजही समाजात याबाबत गैरसमजुती आणि कुप्रथा पाळल्या जातात. याचा परिणाम नंतर बालकांच्या वाढीवर होतो. यासाठीचे मार्गदर्शन सोप्या पद्धतीने होण्यासाठी तसेच जन्मानंतर एक तासाच्या आत बाळाला स्तनपानाचे प्रमाण वाढविणे, बाळाच्या सहा महिन्यांनंतर दोन वर्षांपर्यंत स्तनपानाबरोबरच वरच्या आहाराचे प्रमाण वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ अभियान सुरू आहे.

Advertisement

या अभियानाचे यश पाहून महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे अभियान राज्यात राबविण्याबाबत सूचना केली आहे. मुंबईत मंत्रालयात याबाबत त्यांनी बैठक घेतली. या बैठकीला सातारा जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी ढवळे ही उपस्थित होत्या. यावेळी मंत्री तटकरे यांनी ‘मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम’ तसेच अभियानाच्या यशाबद्दल माहिती घेतली. याचा फायदा गर्भवती महिला तसेच स्तनदा मातांना मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. या अभियानाचा उद्देश पाहून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात हे अभियान राबविण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच याबाबत त्यांनी संबंधितांना सूचनाही केली आहे.

"सातारा जिल्हा परिषदेने 'मिशन धाराऊ-माता दुग्धामृतम' या अभियानास खऱ्या अर्थाने वीर दुधाई धाराऊ-माता गाडे पाटील यांचे नाव देऊन त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा दिला आहे. तसेच महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्यामुळे या अभियानाच्या माध्यमातून वीर धाराऊंचे नाव राज्यातील गावा-गावांत पुन्हा एकदा घेतले जाणार आहे. यामुळे सातारा जिल्हा परिषद व मंत्री आदिती तटकरे यांचे मनापासून आभार."
     -अमितदादा गाडे पाटील(वीर दुधाई धाराऊ-माता गाडे पाटील वंशज)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page