भोर तालुक्यातील कापूरहोळ येथील पेट्रोल पंप कर्मचारीच पैसे घेऊन फरार; गुन्हा दाखल
कापूरहोळ : कापूरहोळ (ता.भोर, जि.पुणे.) येथील राजेश ऑटो मोबाईल पेट्रोल पंपावर एक अजब घटना घडली आहे. येथील कर्मचारीच डिझेल चे जमा झालेले एकूण २२ हजार ७६३ रुपये घेऊन फरार झाला आहे. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशन येथे कर्मचारी भिवा शशिकांत वारंग (रा. तुळसुली ता.कुडाळ जि. सिंधुदुर्ग) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
बुधवार (दि.२२ नोव्हेंबर) रोजी भिवा वारंग हा कर्मचारी कामावर रुजू होता. सकाळी ७ ते दुपारी १२:३० च्या दरम्यान हा कर्मचारी पंपावर दिसत नसल्याची घटना निदर्शनास येताच पेट्रोल पंपावरील दुसरे कर्मचारी विनायक गाढवे यांनी भिवास मोबाईल वर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा फोन बंद आला. यामुळे कर्मचारी विनायक गाढवे यांनी राजगड पोलिस स्टेशन येथे धाव घेतली. याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे फिर्याद नोंदवली आहे. भिवाकडे डिझेल विक्री करून मिळालेली एकूण रक्कम २२ हजार ७६३ रुपये घेऊन तो फरार झाला आहे. सदर घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार गणेश लडकत करीत आहेत.