नसरापूर ग्रामपंचायत कार्यालयात थेट तोडफोड आणि दमदाटीचा थरार; राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
नसरापूर : शासकीय कार्यालय म्हणजेच ग्रामपंचायत हे नागरी सेवेसाठी महत्त्वाचे ठिकाण असताना, तिथे थेट घुसून गोंधळ घालण्याचा प्रकार समोर आला आहे. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. ७ जुलै) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास नसरापूर (ता. भोर) येथे घडला. या प्रकरणी रुपेश रविंद्र ओव्हाळ (वय ३९, रा. सिद्धार्थनगर, नसरापूर) यांनी राजगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मंगेश हनुमंत शिंदे (रा. नायगाव, ता. भोर) याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश शिंदे हा ग्रामपंचायत कार्यालयात येऊन “तुमचे ग्रामसेवक कोठे आहेत?” अशी विचारणा करू लागला. फिर्यादी ओव्हाळ यांनी ग्रामसेवक ससेवाडी येथे गेले असल्याचे सांगितल्यावर आरोपीने संतप्त होऊन थेट ग्रामसेवक यांच्या टेबलवरील काच फोडून नुकसान केले.
तसेच, “तु असे करू नकोस” असे म्हणणाऱ्या फिर्यादीस आरोपीने शिवीगाळ करत धमकी दिली की, “इथे तुला काम करु देणार नाही.” या प्रकारामुळे ग्रामपंचायत कार्यालयातील कर्मचारी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शासकीय कार्यालयांतील सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.