टापरेवाडी गावच्या हद्दीत उसाच्या ट्रॉलीला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 

सारोळे : कुटुंबाला गावी भेटण्यासाठी निघालेल्या तरुणावर काळाने घाला घातला आहे. उसाच्या ट्रॉलीला पाठीमागून जोरात धडक दिल्याने पुरंदर तालुक्यातील मांडकीच्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना सारोळे – वीर रोडवरील टापरेवाडी (ता.भोर) गावच्या हद्दीत शुक्रवारी (दि. १३ डिसेंबर) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. सुधीर शिवाजी जगताप (वय ३५ वर्ष, रा. मांडकी, ता. पुरंदर, जि. पुणे) असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Advertisement

याबाबत अधिक माहिती अशी कि, सुधीर हा पुणे येथे एका कंपनीत कामाला आहे. दिवस पाळीचे काम उरकून तो आपल्या टू व्हीलर वर कामानिमित्त गावी निघाला होता. सारोळा-वीर रोडने जात असताना भोर तालुक्यातील टापरेवाडी येथे रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान पुढून आलेल्या गाडीच्या प्रकाशामुळे त्याला न दिसलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून जोराची धडक दिली.

या अपघातात तो गंभीर जखमी झाला, नागरिकांनी तातडीने जवळच्या जोगळेकर रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन लहान मुले आहेत. आई-वडील गावी शेती करतात, त्यांची भेट घेण्यासाठी तो आपल्या मूळ गावी मांडकी येथे निघाला होता. प्रवासादरम्यानच त्याच्यावर काळाची झडप बसली असून यामध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण मांडकी गावावर शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page