कोथरूड पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार निलंबित; वकिलास लाच घेण्यास प्रोत्साहित केल्याचे तपासात निष्पन्न
पुणे : गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांना पैसे द्यावे लागतील, असे सांगून महिलेकडून लाच स्वीकारणाऱ्या वकिलाविरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या चौकशीदरम्यान सहायक फौजदाराने वकिलाला महिलेकडून लाच घेण्यास प्रोत्साहित केल्याचे समोर आले. त्यामुळे कोथरूड पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार गोपाळ हरिश्चंद्र पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी तक्रारदार महिलेच्या दोघा मित्रांना चौकशीसाठी दोन जानेवारी रोजी शास्त्रीनगर पोलिस चौकीत आणले होते. त्यावेळी वकील सुमीत नामदेवराव गायकवाड (वय २५, रा. आंबेगाव पठार) यांनी महिलेसह तिच्या मित्रांवर गुन्हा दाखल न करण्यासाठी पोलिसांसोबत तडजोड करतो. त्यासाठी पोलिसांना पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले.
त्यानुसार महिलेसह तिच्या मित्रांनी गायकवाड यांना एक लाख ५५ हजार रुपये दिले. परंतु उर्वरित रक्कम पोलिसांना दिल्याशिवाय पुढील काम होणार नाही, असे या वकिलाने सांगितले. त्यानंतर महिलेने वकिलास २० हजार रुपये ऑनलाइन पाठविले. परंतु याबाबत महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) तक्रार दिली. त्यानंतर ‘एसीबी’ने गायकवाडविरुध्द गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्याच्या तपासात सहायक फौजदार पवार यांनी वकिलास महिलेकडून लाच घेण्यासाठी प्रोत्साहित केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार सहायक फौजदार पवार यांच्याविरुध्द कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यानंतर पवार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. याबाबत परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त संभाजी कदम यांनी आदेश काढले.