वडगाव डाळमध्ये कातकरी समाजाचे ‘स्वप्न घरकुल’ साकार; एकाच दिवशी ३५ कुटुंबांचे गृहप्रवेश

भोर : वडगाव डाळ (ता. भोर) येथे प्रधानमंत्री जनमन घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून कातकरी समाजातील ३५ वंचित आदिवासी कुटुंबांचे स्वप्न साकार झाले. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या उपस्थितीत या घरकुलांचा गृहप्रवेश समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.

ग्रामपंचायत वडगाव डाळ येथील एकाच ठिकाणी ३५ घरकुलांचे एकत्रित बांधकाम करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणीही मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी बुधवारी (दि. ९ जुलै) केली. तसेच त्यांनी घरकुलांची गुणवत्ता तपासून समाधान व्यक्त केले. यावेळी आशा नथू पवार व रेखा मंगेश वाघमारे या दोन लाभार्थ्यांच्या घरांचा गृहप्रवेश त्यांच्या हस्ते पार पाडला.

Advertisement

या कार्यक्रमास गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे, विस्तार अधिकारी माणिक घोगरे, ग्रामपंचायत अधिकारी परमेश्वर खटके, सरपंच नवनाथ चौधरी, उपसरपंच शुभम उल्हाळकर, तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधीर खोपडे, संदीप गायकवाड, वंदना चौधरी व रुपाली बरदाडे उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी यावेळी सांगितले की, “प्रधानमंत्री जनमन घरकुल योजनेतून कातकरी समाजातील अनेकांना स्वतःचे घर मिळाले असून, हा खराखुरा परिवर्तनाचा क्षण आहे. या प्रकल्पासाठी गटविकास अधिकारी धनवाडे यांनी विशेष मेहनत घेतली असून, शासनाच्या निधीबरोबरच पत्रे, खिडक्या, दरवाजे व रंगकामासाठी आवश्यक ती अतिरिक्त मदतही मिळवून दिली. त्यामुळे ही घरकुले लवकर आणि दर्जेदार स्वरूपात पूर्ण झाली आहेत.”

लाभार्थ्यांनीही आपल्या प्रतिक्रिया देताना सांगितले की, “हे घर आमचं स्वप्न होतं, आता ते सत्यात उतरलं आहे.” अशा भावना त्यांनी व्यक्त करत शासन व प्रशासनाचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page