तब्बल पंचवीस वर्षानंतर उद्या वेल्ह्यात(राजगड) शरद पवारांची सभा
राजगड : बारामती मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ प्रदीर्घ कालावधीनंतर म्हणजे पंचवीस वर्षानंतर शरद पवार यांची वेल्ह्यात(राजगड) उद्या मंगळवारी(दि. ३० एप्रिल) रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मेंगाई देवस्थान ट्रस्टच्या कुस्ती आखाडा मैदाना समोरील प्रांगणात सभा होणार आहे. या सभेमध्ये शरद पवार काय बोलणार याची मोठी आहे उत्सुकता वेल्ह्यातील(राजगड) नागरिकांना लागली आहे. या सभेसाठी जोरदार तयारी सुरू असून या ठिकाणी हेलिपॅड ची सुविधाही करण्यात आली आहे.
महाविकास आघाडी मधील भोर-राजगड-मुळशीचे आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे. तसेच उद्धव ठाकरे गटाचे निष्ठावंत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.
गेल्या तीन लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राजगड तालुक्यातील नागरीकांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांच्यावर विश्वास टाकत तीनही निवडणुकांमध्ये मताधिक्य दिले होते. मात्र राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडल्याने तसेच महत्त्वाची पदे असलेले अनेक पदाधिकारी अजित पवार यांच्या सोबत गेल्याने तालुक्यात सुप्रिया सुळे यांच्यापुढे आव्हान निर्माण झाले आहे.
अजित पवार हे शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करत असून त्यातच भोर मध्ये झालेल्या सभेमध्ये यांनी सुप्रिया सुळे यांनी पंधरा वर्षे काय केले नुसते बोलून चालत नाही तर काम करावे लागते असे वक्तव्य केले होते या वक्तव्यावर शरद पवार काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता तालुक्यातील नागरिकांना लागली आहे. या सभेसाठी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार, सुप्रिया सुळे, काँग्रेस कडून आमदार संग्राम थोपटे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे कडून मिलिंद नार्वेकर उपस्थित राहणार आहेत.