मुंबईत खून करुन मृतदेह मुळशी परिसरात टाकणाऱ्या चार आरोपींना अटक, खंडणी विरोधी पथक दोनची कारवाई
मुळशी : पुणे पोलीस दलातील पौड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी (दि.२१ डिसेंबर) गणवडी गावाजवळ एका अनोळखी व्यक्तीचा खून करुन मृतदेह फेकल्याची घटना उघडकीस आली होती. या गुन्ह्यातील चार आरोपींना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोनच्या पथकाने अटक केली आहे. मृत व्यक्ती मुंबई येथील रहिवासी असून आरोपींनी मुंबई येथे जाऊन त्याचा खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पुणे-कोलाड रोडलगत फेकून दिला होता.
झो मॅन्युअल परेरा (रा. कलिना, मुंबई) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर अशोक महादेव थोरात (वय-३५ रा. वारजे मुळ रा. मुपो पारुडी, ता. आष्टी जि. बीड), गणेश साहेबराव रहाटे (वय-३५ रा. अप्पर, पुणे मुळ रा. मुपो सावळी बु. ता. अकोले, जि. अमरावती), धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके (वय-४० रा. भवानी पेठ), योगेश दत्तु माने (वय-४२ रा. वारजे माळवाडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. धीरज उर्फ बंटी लक्ष्मण साळुंके हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खून, अपहरण, खंडणी, मारहाण यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
खंडणी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरिक्षक मोहनदास जाधव यांना माहिती मिळाली की, पुण्यातून कलिना मुंबई येथे जाऊन काही जणांनी झो मॅन्युअल परेरा याचा खून करुन मृतदेह मुळशी परिसरात टाकला आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाची दोन पथके तयार करुन आरोपींचा शोध घेऊन आरोपींना गुन्ह्यात वापरलेल्या वाहनासह ताब्यात घेतले.
आरोपींकडे चौकशी केली असता झो परेरा हा योगेश माने याच्या मेहुणीसोबत लीव्ह इन रिलेशनशीप मध्ये राहत होता.
माने याची मेहुणी आणि परेरा यांच्यात वाद झाले होते. याच कारणावरुन आरोपींनी बुधवारी (दि.२० डिसेंबर) परेरा राहत असलेल्या कलिना येथील घरात शिरुन त्याला बोथट हत्याराने मारहाण केली. तसेच त्याचा गळा आवळून खून केला. यानंतर गाडीत टाकून पुरवा नष्ट करण्यासाठी मृतदेह मुळशी परिसरात रोडलगत झुडपात टाकून दिल्याचे आरोपींनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त रितेश कुमार,अपर पोलीस आयुक्त पोलीस सह आयुक्त अतिरिक्त कार्यभार गुन्हे रामनाथ पोकळे,
पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे २ सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर, पोलीस उप निरीक्षक मोहनदास जाधव,श्रीकांत चव्हाण, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे, ईश्वर आंधळे, सचिन अहिवळे, संग्राम शिनगारे, विजय गुरव, प्रदिप शितोळे, आशा कोळेकर, शंकर संपते, सैदोबा भोजराव, चेतन आपटे, पवन भोसले, अमोल पिलाणे, चेतन शिरोळकर, किशोर बर्गे, रुपाली कर्णवर यांच्या पथकाने केली.