शिवरायांचा राजगड झाला जागतिक ठेवा; युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झाल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

राजगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची साक्ष देणाऱ्या राजगड किल्ल्याची युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत निवड झाल्याच्या ऐतिहासिक घटनेचा जल्लोष शनिवारी (दि. १२ जुलै) राजगड पायथ्याशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात पेढे वाटून आणि फटाके फोडून गडप्रेमींनी छत्रपतींना अभिवादन केले. राजगडचा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने निनादून गेला. खंडोबामाळ येथे पारंपरिक शिवकालीन पोशाखातील गड्यांनी मर्दानी खेळ सादर करत महाराजांना मानवंदना दिली.

या कार्यक्रमाला भोर विधानसभेचे आमदार शंकर मांडेकर, भोर उपविभागीय अधिकारी डॉ. विकास खरात, महेश हरिश्चंद्रे, तहसीलदार निवास ढाणे, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, शिक्षणाधिकारी संग्राम पाटील, पुरातत्त्व विभागाचे हरिभाऊ बारगजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, राजगड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष किरण राऊत, माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल नलावडे, निर्मला जागडे, शंकरराव भूरूक, अनंता दारवटकर, संदीप खुटवड, गोपाळ इंगुळकर, आनंद गोरड, मोनिका बांदल, दत्तात्रय पानसरे, अशोक सरपाले, गुलाब रसाळ, शंकर रेणुसे, भरत चोरघे, गुलाब खुटवड, संदीप शिंदे, निलेश खामकर, पांडुरंग मांगडे, प्रतिक साष्टे, सौरभ पानसरे, अथर्व चव्हाण यांच्यासह वनविभागाचे अधिकारी, शिवप्रेमी तरुण व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisement

यावेळी आमदार शंकर मांडेकर म्हणाले, “राजगड हा छत्रपती शिवरायांच्या कारकीर्दीतील महत्त्वाचा किल्ला. युनेस्कोने १२ मराठा किल्ल्यांना ‘मराठा लष्करी वास्तूंचे लँडस्केप’ म्हणून मान्यता दिली असून, राजगडचा समावेश हा अत्यंत अभिमानास्पद आहे. लवकरच येथे शिवरायांचा भव्य पुतळा, राजमुद्रा आणि भगवा ध्वज उभारण्यात येणार आहे.”

राजगड ही केवळ ऐतिहासिक वास्तू नसून, मराठा साम्राज्याची पहिली राजधानी आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेचा पहिला साक्षीदार आहे. आज या गडाला मिळालेला जागतिक गौरव हा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा क्षण आहे. राजगडचे हे ऐतिहासिक स्थान आता जागतिक नकाशावर अधोरेखित झाले असून, यानंतर गड संवर्धन आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलली जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page