पुण्यात काँग्रेसला पुन्हा धक्का? संजय जगताप भाजपच्या वाटेवर? राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा
सासवड : पुणे जिल्ह्यात काँग्रेससाठी मोठ्या धक्क्याची चाहूल लागली आहे. पुरंदर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांचा लवकरच भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश होणार असल्याच्या चर्चांना सध्या जोर चढला आहे. संग्राम थोपटे आणि रवींद्र धंगेकर यांच्यानंतर काँग्रेससाठी हा संभाव्य ‘तिसरा मोठा झटका’ ठरू शकतो, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
वर्चस्व गमावणाऱ्या काँग्रेसची स्थिती डळमळीत…
एकेकाळी पुणे जिल्ह्यात भक्कम पकड असलेल्या काँग्रेस पक्षातून सध्या वरिष्ठ नेते पाय काढत आहेत. अलीकडेच आमदार संग्राम थोपटे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला, तर कसबा मतदारसंघाचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी शिवसेनेच्या (शिंदे गट) गळ्यात माळ घातली. आता संजय जगताप यांच्या संभाव्य भाजपप्रवेशामुळे काँग्रेस पक्षाची जिल्ह्यातील अवस्था अधिकच डळमळीत होण्याची चिन्हे दिसत आहेत.
जगताप यांच्या भाजप प्रवेशाची पार्श्वभूमी…
संजय जगताप हे काही वर्षांपूर्वी पुरंदरमधून काँग्रेसच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. मात्र, पुढील निवडणुकीत शिवसेनेचे विजय शिवतारे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दुय्यम स्थानावर गेल्याचे बोलले जात होते. अलीकडे सासवड व जेजुरीतील काँग्रेसचे माजी नगरसेवक व कार्यकर्ते त्यांच्या संपर्कात असून, भाजप प्रवेशासाठी दबाव वाढवला आहे. त्यामुळे त्यांच्या संभाव्य निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलणार?..
विशेष म्हणजे, जगताप कुटुंबाची पुरंदरमध्ये राजकीय पकड असल्याने त्यांच्या भाजप प्रवेशामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणं पूर्णतः बदलण्याची शक्यता आहे. भाजपसाठीही हा प्रवेश ‘गेम चेंजर’ ठरू शकतो, कारण अनेक वर्षांपासून तालुक्यात सत्ता मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला स्थानिक स्तरावर संजय जगताप यांच्या रूपाने मजबूत नेतृत्व मिळू शकते.
विजय शिवतारेंना घरचा आहेर?..
तसेच, विजय शिवतारे यांना पक्षांतर्गत शह देणाऱ्या नेत्यांची कमतरता असल्याने, संजय जगताप यांचा भाजप प्रवेश हा शिवतारेंनाही मोठा राजकीय धक्का ठरू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ही घडामोड भाजपसाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
अधिकृत घोषणेची प्रतीक्षा कायम…
दरम्यान, संजय जगताप यांनी अद्याप यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसली, तरीही त्यांच्या हालचालींवरून ते भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यामुळे पुरंदर आणि पुणे जिल्ह्यात आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.