किरण दगडे पाटील युवामंच तर्फे उद्या भोर शहरामध्ये महिलांसाठी “होम मिनिस्टर खेळ पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन; अभिनेते प्रवीण तरडे, आकाश ठोसर, किरण गायकवाड यांची उपस्थिती
भोर : पुण्याचे माजी नगरसेवक व भारतीय जनता पार्टीचे भोर विधानसभा प्रमुख किरण दगडे पाटील युवा मंच तर्फे भोर शहरामध्ये एका उत्सवी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समाजाला आकार देण्यामध्ये आणि भावी पिढ्यांना प्रेरणा देण्यासाठी महिलांची महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित करून विविध क्षेत्रांतील महिला कर्तृत्ववानांच्या उल्लेखनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे उद्या शनिवारी(दि. १ जून) सायंकाळी श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जुनियर कॉलेज मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती किरण दगडे पाटील युवा मंचचे अमर बुदगुडे यांनी दिली.
या कार्यक्रमानिमित्त अभिनय क्षेत्रातील नावाजलेले अभिनेते मुळशी पॅटर्न फेम प्रवीण तरडे, सैराट फेम आकाश ठोसर व लोकप्रिय मालिका देवमाणूस फेम किरण गायकवाड हे प्रमुख आकर्षण असणार आहेत. तसेच यानिमित्ताने क्रांतीनाना मळेगावकर प्रस्तुत न्यू होम मिनिस्टर “खेळ पैठणीचा” हा भन्नाट कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास महिलांसाठी विविध बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये टू व्हीलर, एलईडी टिव्ही, फ्रिज, पीठ गिरणी, शिलाई मशीन, १०० पैठणी अशा अनेक बक्षिसांचा समावेश असणार आहे. तसेच या कार्यक्रमांस उपस्थित असणाऱ्या प्रत्येक महिलेस आकर्षक भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती किरण दगडे पाटील युवा मंच तर्फे देण्यात आली. तसेच भोर तालुक्यातील महिलांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमांस उपस्थित राहून कार्यक्रमांची शोभा वाढवण्याचे आवाहनही या वेळेस त्यांनी केले.