शिवगंगा, गुंजवणी खोऱ्यात पावसाचा हाहाकार! ओढे, नदीनाले तुडुंब; अनेक पुल पाण्याखाली
नसरापूर : भोर तालुक्यातील शिवगंगा आणि गुंजवणी खोऱ्यात काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्याने शिवगंगा आणि गुंजवणी या नद्यासह ओढेनाले तुडुंब भरून वाहत आहे. काही भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत देखील झाल्याचे पाहायला मिळत आहे.
शिवगंगा आणि गुंजवणी खोऱ्यात भातपिके अधिक घेतली जात असून पालेभाजी, उसपिके बागायत पट्ट्यात घेतली जात आहे. गेल्या चार दिवसांपासून रात्रभर पावसाने धुमाकूळ घातल्याने तालुक्यातील भिलारवाडी, जांभळी, निधान- सांगवी व शिवगंगा नदीच्या खोऱ्यातील केळवडे, साळवडे, वरवे, शिवरे, नसरापूर कामथडी येथील शेतकर्यांचे फळभाज्याचे नुकसान झाले आहे. तर कांबरे-देगाव, कामथडी-नसरापूर, केळवडे-साळवडे पुल पाण्याखाली गेला आहे. गुंजवणी धरणातून चार हजार तीनशे पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
शिवगंगा व गुंजवणी नदीपात्रात कोसळणाऱ्या पावसामुळे पाणी पातळी साधारण ३५ फुटावर पाण्याची पोहोचली असून पावसाचा जोर राहिल्यास कोणत्याही क्षणी धोका पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अनेक ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेले असून जवळपास १५ ते २० गावांचा संपर्क तुटला आहे. संततधार पावसामुळे शिवगंगा व गुंजवणी नदी दुथडी भरून वाहत आहे. या दोन्ही नदी घाटावर मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. अतिवृष्टीमुळे परिसरातील काही गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.