मंतरलेल्या दिवसांच्या स्मृति जपणारा “न्यु इंग्लिश स्कूल, हातवे”चा स्नेहमेळावा
नसरापूर : शाळेतल्या शिक्षकांना भेटण्याची उत्सुकता, आपल्या सवंगड्यांना शोधणाऱ्या नजरा, शाळेतल्या मंतरलेल्या दिवसांची आठवण, मित्र-मैत्रिणींच्या साक्षीनं अनुभवलेले संवेदनशील क्षण, कट्ट्यावर केलेला कल्ला, उराशी बाळगलेल्या स्वप्नांचा डोंगर, मनात दाटून येणाऱ्या आठवणी, जीवनाच्या प्रवासात स्थिरावल्यानंतर ‘बॅचमेट’ना भेटण्याची उत्सुकता अशा उत्साहवर्धक वातावरणात “कै. ना. काशिनाथराव खुटवड माध्यमिक विद्यालय(न्यु इंग्लिश स्कूल, हातवे(ता. भोर))” येथे इयत्ता दहावी, २०१० च्या बॅचच्या माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमेळावा तब्बल १४ वर्षांनंतर रविवारी(दि. ९ जून) रंगला!
या कार्यक्रमाला सकाळी ११ वाजता सुरुवात झाली. शाळेतील माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वांचे स्वागत करण्यात आले. शाळेत शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज राजकारण, उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रात काम करीत असून त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. सर्व माजी विद्यार्थी एकत्र आल्यावर सर्वानी आपला परिचय दिल्यावर विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. या गप्पांच्या ओघात सर्वजण आपण वयाने मोठे झालो हे विसरून गेले होते.
वेगवेगळ्या क्षेत्रात काम करीत असताना जीवनात यश मिळवले असले तरी त्यामागे शाळेचे संस्कार आहेत, अशी भावना अनेक माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर स्नेह भोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. या मेळाव्याला मुख्याध्यापक वाल्हेकर सर, चित्रकलेचे शिक्षक तामकर सर तसेच संजय खुटवड सर हे उपस्थित होते. आपल्या जीवनाला दिशा देणारे मित्र, मैत्रिणी, शिक्षक, शाळा यांच्याबद्दल ऋतज्ञता व्यक्त करत प्रत्येक जणाने या स्नेहमेळाव्याच्या आठवणी मनात साठवल्या.