भोरच्या वाठार हिरडस मावळमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; तीन जणांना घेतला चावा
भोर : भोर तालुक्यातील वाठार हिरडस मावळमध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने उच्छाद मांडला आहे. या कुत्र्याने आत्तापर्यंत गावातील तीन जणांवर हल्ला केला असून यात तीनही ज्येष्ठ नागरिक जखमी झाले आहेत. यातील एकावर शिरवळ तर दोन ज्येष्ठांवर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या मोकाट पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त संबंधित प्रशासनाने लवकरात लवकर करण्याची मागणी प्रियेश खाटपे, सागर खाटपे तसेच गावातील नागरिकांनी केली आहे.
गावात भीतीचं वातावरण!
वाठार हिरडस मावळ गावात या मोकाट कुत्र्याच्या दहशतीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. गावात दिसेल त्या व्यक्तीच्या अंगावर धावून जात हा पिसाळेला कुत्रा चावा घेत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणं अवघड झालं आहे. तर हा कुत्रा लहान बालकांच्या अंगावर देखील चावा घेत असल्याने पालकांमध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर अनेकजण हातात काठ्या-लाठ्या घेऊन घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने व संबंधित विभागाने मोकाट कुत्र्यांना पकडण्यासाठी उपाययोजना करून बंदोबस्त करावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.